Tue, Jun 15, 2021 11:48होमपेज › Vidarbha › चहा विकून महिन्याला ५ लाख कमावणारा ‘आयटीवाला’

चहा विकून महिन्याला ५ लाख कमावणारा ‘आयटीवाला’

Published On: Apr 19 2018 2:29PM | Last Updated: Apr 19 2018 2:29PMनागपूर : पुढारी ऑनलाईन 

‘चहासाठी काय पण’ असे म्हणणारे अनेक वेडे या जगात सापडतील. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका ‘चायवाली’ने तिच्या देशात चहाचे हॉटेल सुरू केले. यातून तिने कोट्यावधी रूपयांचा नफा मिळवल्याचे तुम्ही वाचले असेल. आता हे झाले परदेशीतील चहासाठी वेडे असण्याचे उदाहरण. पण, महाराष्ट्रातील नागपूरमध्येही एक इंजिनिअर जोडपे चहासाठी वेडे आहेत. या जोडप्याने चहा विकण्यासाठी पुण्यातील आयटी कंपनीतील नोकरीला रामराम ठोकून एक ‘चहा व्हिला’ उभारला आहे. 

नितीन बियानी आणि पूजा बियानी असे या जोडप्याचे नाव आहे. या जोडप्याचे एकमेकांवर असलेल्या प्रेमापेक्षाही जास्त प्रेम चहावर आहे. म्हणूनच आयटी कंपनीतील १५ लाख पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. नोकरी सोडून नागपूरात आल्यावर बियानी जोडप्याने ‘चाय व्हिला, रिफ्रेश युवरसेल्फ’ या नावाचे टी-शॉप सुरू केले. 

या व्हिलामध्ये चहा आणि कॉफीचे १५ प्रकार उपलब्ध आहेत. आमच्या या दुकानात अनेक प्रकारचे स्नॅक्सही मिळतात. आम्ही व्हॉट्स ॲप आणि झोमॅटोवरूनही ऑर्डर स्वीकारतो. ऑफीस, हॉस्पिटल आणि बँकेत चहा पोहोचवण्यासाठी स्पेशल डबे वापरतो. हा व्यवसाय वाढवावा अशी अनेक ग्राहकांनी आम्हाला विनंती केली असल्याची माहिती, नितीन बियानी यांनी दिली. 

मी आयबीएम आणि कॉगनिझंट या आयटी कंपन्यांमध्ये १० वर्ष काम केले आहे. पण, माझ्या पत्नीची इच्छा होती की मी आयुष्यात काहीतरी वेगळे करावे. म्हणून आम्ही ‘चाय व्हिला’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. या दुकानातून मला महिन्याला ५ लाखांचा नफा होतो. या दुकानाला टेक्नॉलॉजीशी जोडण्यासाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतो, असे बियानी यांनी सांगितले. 

‘चहा व्हिला’मध्ये चहाचे अनेक प्रकार मिळतात. सामान्यांच्या खिशाला परवडतील, असे त्यांचे दर असतात. चहा आरोग्यासाठी चांगला असल्याने मी येथे नेहमी येतो, असे एका ग्राहकाने सांगितले.  

No automatic alt text available.