Thu, Sep 24, 2020 15:39होमपेज › Vidarbha › एका ट्रान्सफॉर्मरवर दोन शेतकरी! - बावनकुळे

एका ट्रान्सफॉर्मरवर दोन शेतकरी! - बावनकुळे

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 15 2017 1:23AM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

एकाचवेळी अनेक कृषिपंप सुरू केल्यामुळे  ट्रान्स्फॉर्मर जळण्याच्या घटना घडतात. अनेक दिवस दुरुस्तीचे काम होत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापुढे दोन शेतकर्‍यांसाठी एक ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

विधानसभेत गुरुवारी याबाबत त्यांनी ही माहिती दिली. बावनकुळे म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून तीन वर्षात ऊर्जा विभागाने साडेचार लाख शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले असून शेतकर्‍यांना दिवसा 12 तास वीजपुरवठा करायचा असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. नांदेड, धारणी येथील 400 मेगावॉटचे केंद्र पूर्ण झाले असून 67 उपकेंद्रे पूर्ण होण्याच्या तयारीत आहेत. महापारेषणने आपली यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार केला आहे. त्यात 75 नवीन उपकेंद्र निर्माण करण्यात येणार असून 27096 मेगावॉटने पारेषणची क्षमता वाढणार आहे. आणखी 7000 कोटी रुपये खर्च करून देशातील सर्वात मजबूत पारेषण कंपनी उभी करण्यात येणार आहे, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

ग्राहकांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी सर्वाना अपेक्षित असलेली महावितरण आणि महापारेषण कंपनी तयार करण्यासाठी 13398 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. तसेच प्रभावी काम करण्यासाठी महावितरणमध्ये 10 हजार कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे. कारण गेल्या 30 वर्षात महावितरणच्या यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीवर काहीही खर्च करण्यात आला नाही. 30 वर्षांपासून वीजपुरवठा करणारी यंत्रणा आधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

भाजप सरकारने थकित वीजबिलासाठी एकाही शेतकर्‍याचा वीजपुरवठा खंडित केला नाही. सध्या शेतकर्‍यांकडे 22 हजार कोटींची वीजबिलांची थकबाकी आहे. 1559 कोटी नळ योजनांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. 3240 कोटी रुपये पथदिव्यांची थकबाकी आहे. 31 हजार कोटींची ही थकबाकी भरण्यात आली तर संपूर्ण यंत्रणा आधुनिक होऊ शकेल, असा दावा बावनकुळे यांनी केला.