होमपेज › Vidarbha › अमरावती : गांधीजींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवा : मनसुख मांडवीय

अमरावती : गांधीजींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवा : मनसुख मांडवीय

Last Updated: Jan 17 2020 1:15AM
गुरुकुंज मोझरी (अमरावती) : विशेष प्रतिनिधी 

महात्मा गांधीजी यांच्या विचारांची ताकद नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी संकल्प पदयात्रा मोलाची ठरेल, असे केंद्रीय जहाज बांधणी, रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. 

गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत से राष्ट्रपिता मोझरी- सेवाग्राम गांधी संकल्प पदयात्रेचा शुभारंभ राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार रवी राणा, जि. प. सदस्य गौरी देशमुख, शरद वानखडे, मोझरीचे सरपंच बबलूभाऊ मकरमपुरे, संतोष महात्मे, गुरुदेव सेवा आश्रमाचे प्रकाश वाघ, जनार्दन बोथे, डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, बालाजी पवार, सुरेखाताई ठाकरे, रघुनाथ वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

वाचा : बारामती : छेडछाड करताना जाब विचारल्याने महिला सरपंचाच्या पतीचा निर्घृण खून

या कार्यक्रमात राज्यमंत्री मनसुख मांडवीय म्हणाले की, 'देशाला ग्रामगीतेतून ग्रामस्वराज्याचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भुमीतून गांधीविचाराचा प्रसार करण्यासाठी पदयात्रा सुरू होत आहे, ही महत्वपूर्ण घटना आहे. गाव समृद्ध होईल तर राष्ट्र समृद्ध होईल. स्वच्छता, शिक्षण, स्वावलंबन याबाबत गांधीजी यांनी दिलेली शिकवण आजही पथदर्शक आहे. ही शिकवण तरुणाईच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. या कार्यात पदयात्रेचा उपक्रम मोलाचा ठरेल.गांधी विचाराच्या प्रसारासाठी आपण यापूर्वी पदयात्रा आयोजित केल्या होत्या. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळून मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. आज त्या भगिनी मोठ्या पदावर पोहोचल्या आहेत. पदयात्रेसह अनेक विधायक उपक्रमात त्या योगदान देत आहेत.' 

वाचा : सिंचन घोटाळ्यात मला आरोपी ठरवता येणार नाही : अजित पवार

महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जात देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या तत्वांपासून प्रेरणा घेऊन ही पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे डॉ. विकास महात्मे यांनी सांगितले. यावेळी श्रीमती ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मनसुख मांडवीय यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आणि राज्याबाहेरून या यात्रेत सुमारे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले.