Mon, Jul 06, 2020 22:37होमपेज › Vidarbha › राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ विक्री एकाच दराने

राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ विक्री एकाच दराने

Published On: Jul 13 2018 3:23PM | Last Updated: Jul 13 2018 10:29PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये एक ऑगस्टपासून छापील किमतीप्रमाणेच खाद्यपदार्थ विक्री करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी करणार्‍यांवर कारवाई करण्याबाबत गृहविभाग सहा आठवड्यांमध्ये धोरण ठरविणार असल्याची माहिती अन्‍न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

विरोधकांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेऊ दिले जात नाहीत. त्यांच्याकडील खाद्यपदार्थांची ते जादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट करतात. सुरक्षेच्या नावाखाली प्रेक्षकांच्या बॅगा तपासून त्या बाहेर ठेवल्या जातात. ज्येष्ठ नागरिक, मधुमेहसारख्या रुग्णांना तसेच लहान मुलांना ठराविक वेळेनंतर खावे लागते. चित्रपटगृहातील खाद्यपदार्थ त्यांच्या प्रकृतीला योग्य नसतात. पाण्याची बाटलीही छापील किमतीपेक्षा अधिक पैसे घेऊन विक्री केली जात असल्याचे विरोधकांनी लक्षवेधी सूचनेद्वारे निदर्शनास आणले होते. त्यावर केंद्र सरकारने केलेल्या कायद्याप्रमाणे एक ऑगस्टपासून एकाच वस्तूची वेगवेगळी एमआरपी राहणार नसल्याचे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या सदस्य डॉ. नीलम गोर्‍हे यांनी शेजारच्या राज्यांमध्ये मल्टिप्लेक्सची तिकिटे स्थानिक भाषेत छापली जात असल्यामुळे महाराष्ट्रात ती मराठीत छापण्याची सूचना केली, याबाबत सांस्कृतिक खात्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्‍वासन राज्यमंत्री चव्हाण यांनी दिले. मल्टिप्लेक्सच्या मनमानीविरोधात आंदोलन करणार्‍या कार्यर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, तसेच मल्टिप्लेक्समधील पार्किंग चित्रपट पाहण्यासाठी येणार्‍यांना उपलब्ध करावे, अशी मागणी भाजप सदस्य प्रवीण दरेकर यांनी केली. त्यापैकी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील, अशी ग्वाही राज्यमंत्र्यांनी दिली.

विधान परिषदेतील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन मल्टिप्लेक्समुळे निर्माण झालेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक आयोजित करा, असे निर्देश उपसभापतींनी दिले.