होमपेज › Vidarbha › प. बंगालमधील हिंसेचा बंदोबस्त करावा : भागवत

प. बंगालमधील हिंसेचा बंदोबस्त करावा : भागवत

Published On: Jun 17 2019 2:14AM | Last Updated: Jun 17 2019 1:02AM
नागपूर ः प्रतिनिधी 

निवडणूक संपली की स्पर्धा संपली, निवडून येणारे सर्वपक्षीय आता मिळून देशाचे काम करणे आवश्यक असते. मात्र आपल्या देशात आज तसे होताना दिसत नाही. आज पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे. आम्हाला एक हार सहन होत नाही आणि त्याचे पर्यवसान हिंसेत होते ही बाब आपल्याला भूषणावह नाही. सरकारने त्वरित या बाबींची दखल घ्यावी आणि घडणार्‍या प्रकाराचा तत्काळ बंदोबस्त करावा, असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज नागपुरात बोलताना केले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशिक्षा वर्गाच्या तृतीय वर्षीय अभ्यासक्रमाच्या समारोप समारोहात ते देशभरातील संघस्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

यावेळी ते म्हणाले, निवडणुका म्हणजे स्पर्धा आली, स्पर्धेत परस्परांवर टीका ही होतेच; मात्र निवडणुका संपल्यावर हे वातावरण निवळायला हवे. शिमगा सरला तरी कवित्व जात नाही, असे म्हणतात. मात्र शिमगा सरताच हे कवित्व संपायला हवे आणि परस्परांसोबतचा अभद्र व्यवहार थांबवून आता आम्ही सर्व एक आाहोत ही भावना प्रतिष्ठित व्हायला हवी. 

जिंकणार्‍यांनी जिंकल्याचा माज येऊन मस्तीत जगायचे आणि हरणार्‍यांनी हरल्याची भडास काढण्यासाठी आदळआपट करायची हा प्रकार देशासाठी चुकीचाच आहे, असे सांगून हा आता थांबायलाच हवा, असे आवाहन त्यांनी केले.