Sat, Jul 04, 2020 00:58होमपेज › Vidarbha › अमरावतीत काँग्रेसचा पचका! पदरची शंभरहून अधिक मतं भाजपला

काँग्रेसचा पचका! शंभरहून अधिक मतं भाजपला

Published On: May 24 2018 12:04PM | Last Updated: May 24 2018 1:41PMअमरावती : पुढारी ऑनलाईन

विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात काँग्रेसची मोठी नामुष्की झाली. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसच्या अनिल माधोगडिया यांचा दारुण पराभव झाला आहे. याठिकाणी भाजपच्या प्रविण पोटे यांनी ४५८ मते मिळवत विक्रमी विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे माधोगडियांना केवळ १७ मतं मिळाली. या मतदार संघात काँग्रेसचे १२८ मतदार होते. पण, १११ मतदारांनी  माधोगडियांना नापंसती दर्शवल्याचे चित्र निकालानंतर समोर आले आहे.   

या मतदारसंघात भाजपाचे २०० राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, शिवसेना २८, प्रहार, युवा स्वाभिमान आणि इतर पक्ष मिळून ४८९ मतदार होते. यातील ४८८ जणांनी मतदान केले होते. शिवसेना, प्रहार, युवा स्वाभिमान आणि काही अपक्षांनी मतदानापूर्वीच पोटे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच पोटेंचे पारडे जड होते. पण, १२८ मतदार असल्यामुळे काँग्रेसला एवढा मोठा पराभव अपेक्षित नव्हता. काँग्रेसच्या शंभरहून अधिक मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे भाजपचा विजय द्विगुणित झाला आहे.  अमरावतीसह वर्धा येथे भाजपाचे रामदास आंबटकरांचा विजय भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

विधान परिषदेच्या ६ पैकी ५ जागांचे निकालामध्ये भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी दोन जागांवर यश मिळवले. तर कोकणात राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंनी बाजी मारली. या निवडणुकीत काँग्रेसला सपशेल अपयश आले. अमरावतीमध्ये १२८ मतदार असताना झालेला पराभव काँग्रेससाठी धक्कादायक असाच आहे.    

विधान परिषद निकाल : भाजप- सेनेला प्रत्येकी दोन जागा, राष्ट्रवादी एक, अन् काँग्रेसचा भोपळा!