Wed, Aug 12, 2020 03:19होमपेज › Vidarbha › आदित्यसह दिग्गजांना आमदार निवासात खोल्या

आदित्यसह दिग्गजांना आमदार निवासात खोल्या

Last Updated: Dec 15 2019 12:37AM
नागपूर : विशेष प्रतिनिधी

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरनगरी सज्ज झाली आहे.  माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री  आणि प्रतीक्षेतील अनेक दिग्गजांचीही अवस्था येथे अन्य आमदारांसारखी आहे. पूर्वी बंगल्यांवर वास्तव्याची सोय व्हायची, अशा दिग्गजांची व्यवस्था आमदार निवासाच्या खोलीत करण्यात आली आहे.

मंत्री आणि राज्यमंत्री यांची रवी भवन आणि नाग भवन येथील बंगल्यांमध्ये व्यवस्था करण्यात येत असते; मात्र राज्यात तूर्त सहाच मंत्री असल्याने रवी भवनमधील इतर बंगले मालकाची वाट पाहत आहेत. राज्यमंत्रीच नसल्याने नाग भवनचे वाटप झालेले नाही. 

एके काळी रामगिरी निवासस्थानी मुक्‍कामी असणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार आदींचा मुक्‍काम आता आमदार निवासात राहणार आहे. विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडे, तसेच वडेट्टीवार रवी भवनात राहत होते. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांना नियमानुसार आमदार निवासातील खोली देण्यात आली आहे;  मात्र वडील मुख्यमंत्री असल्याने आदित्य ठाकरेही रामगिरीतच राहतील. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अजित पवार यांना आमदार निवासात खोल्या देण्यात आल्या आहेत. युतीच्या काळात चंद्रकांत पाटलांना देवगिरी बंगला होता. 

रवी भवनात सध्या सहा मंत्र्यांची निवासव्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांना बंगला क्रमांक 1, सुभाष देसाई यांना बंगला क्रमांक 2, जयंत पाटील यांना बंगला क्रमांक 3, छगन भुजबळ यांना बंगला क्रमांक 4, बाळासाहेब थोरात यांना बंगला क्रमांक 5, नितीन राऊत यांना बंगला क्रमांक 6 असे वाटप करण्यात आले आहे.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बंगला क्रमांक 23 देण्यात आला आहे.