Sat, Jul 04, 2020 04:12होमपेज › Vidarbha › खैरलांजी हत्याकांडातील दोषीचा कारागृहात मृत्यू

खैरलांजी हत्याकांडातील दोषीचा कारागृहात मृत्यू

Published On: Dec 02 2017 7:48AM | Last Updated: Dec 02 2017 7:48AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

देशभरात खळबळ उडवून देणार्‍या खैरलांजी हत्याकांडातील सहभागाबद्दल शिक्षा झालेले विश्‍वनाथ हगरू धांडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 65 वर्षीय धांडे गेल्या 9 वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते.

देश-विदेशात गाजलेले खैरलांजी हत्याकांड भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात 29 सप्टेंबर, 2006 ला घडले होते. या निर्घृण हत्याकांडाची चर्चा संसदेतही झाली होती. अवघ्या 7 महिन्यांत न्यायालयात दाखल झालेल्या आणि दीड वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल 15 सप्टेंबर, 2008 रोजी लागला. भंडारा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार 11 पैकी गोपाल सक्रू बिंजेवार, सक्रू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, विश्‍वनाथ धांडे, प्रभाकर मंडलेकर, जगदीश मंडलेकर, रामू धांडे आणि शिशुपाल धांडे या आठ आरोपींना फाशीची शिक्षा झाली. तर, महिपाल धांडे, धर्मपाल धांडे आणि पुरुषोत्तम तितीरमारे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून या निकालाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपिल करण्यात आले. नागपूर खंडपीठाने गोपाल बिंजेवार आणि शिशुपाल धांडे वगळता अन्य सहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना 25 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन सध्या न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, 25 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेले विश्‍वनाथ धांडे हे 9 वर्षांपासून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. त्यांचा बंदी क्रमांक सी 7669 हा होता. बुधवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली. त्यांना सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला.

या हत्याकांडात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मृत झालेले धांडे हे दुसरे दोषी आहेत. अन्य दोषींपैकी जगदीश मंडलेकर हा 2012 मध्ये मृत झाला. मंडलेकरला दम्याचा त्रास होता. तो 13 फेब्रुवारी, 2012 ला एक महिन्यासाठी पॅरोलवर सुटला होता. मात्र, दम्याचा त्रास वाढल्याने त्याच्या पॅरोलमध्ये एक महिन्याची वाढ करण्यात आली होती. 13 एप्रिलरोजी तो कारागृहात परतत असतानाच त्याचा दमा वाढल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.