Mon, Jul 06, 2020 18:24होमपेज › Vidarbha › सिंचन गैरव्यवहार : प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश

सिंचन गैरव्यवहार : प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश

Published On: Dec 14 2017 1:48AM | Last Updated: Dec 14 2017 1:13AM

बुकमार्क करा

नागपूर ः

अमरावती जिल्ह्यातील निम्नपेढी, जिगाव, भातुकली, वाघाडी आणि रायगढ या सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहाराबाबत राज्य सरकारने आजपर्यंत काय पावले उचलली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली. या प्रकरणातील सर्व प्रतिवादींना उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता नाताळाच्या सुट्ट्यांनंतर सुनावणी होणार आहे.

बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला राजकीय प्रभावातून जिगाव, लोअरपेढी, भातुकली आणि वाघाडी या चार सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले असून कंपनीने बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करणार्‍या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान जिगाव , लोअरपेढी या दोन प्रकल्पांबाबत जबाब घेण्यात आले असून एसीबी चौकशी पूर्ण झाली आहे. 23 नोव्हेंबर रोजी सरकारने प्रतिज्ञापत्र दिले. 

जिगाव प्रकल्पाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे आठ अभियंत्यांसह भागीदार सुशील बाजोरिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारने चुकीची माहिती दिली, असे याचिकाकर्ता अतुल जगताप यांनी उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एसीबीने चुकीची चौकशी केली, असा आरोप जगताप यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

या प्रकरणात एसीबीने 22 जणांचे जबाब नोंदविले आहे. जानेवारीमध्ये बाजोरिया यांचाही जबाब घेण्यात आला होता. यानंतर जिगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नियुक्‍ती करण्यात आली. बाजोरिया निविदा मिळण्यासाठी अपात्र असल्याचे समितीने म्हटले होते. या अहवालाच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. याचिकाकर्त्याने केलेले आरोप बाजोरिया यांचे वकील प्रवीण देशमुख यांनी नाकारले आहेत.