Mon, Jul 06, 2020 04:40होमपेज › Vidarbha › साहित्यबाह्य शक्‍तींपुढे किती झुकणार?

साहित्यबाह्य शक्‍तींपुढे किती झुकणार?

Published On: Jan 12 2019 1:33AM | Last Updated: Jan 12 2019 1:37AM
नागपूर ः प्रतिनिधी

साहित्यबाह्य शक्‍तींच्या धमकीपुढे किती झुकावे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असे ठणकावत ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह असून, त्यांचे आगळेवेगळे विचार जोपासायला हवे होते, अशी अपेक्षा यवतमाळ येथे शुक्रवारी सुरु झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्‍त केली.

साहित्य हे सामाजिक परंपरा प्रथांवर रचले जाते. काळाच्या ओघात प्रथा परंपरा जशा गळून पडतात तशाच साहित्य आणि संस्कृतीतील प्रथा आणि परंपरा गळून पडाव्यात, जुने विचार, जुन्या जाणिवा, साहित्यिकांनी झटकून टाकाव्या आणि त्याचबरोबर आपल्या संवेदना कोरड्या होऊ नये याची काळजीही घ्यावी असे त्या म्हणाल्या.

भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी संमेलनानिमित्त झालेल्या वादाचा समाचार घेतला.  त्या म्हणाल्या की, जगातील सर्व साहित्यिकांना मराठीची दारे खुली आहेत. आजवर साहित्य संमेलनांमध्ये अमराठी साहित्यिकांना बोलावून त्यांचे विचार ऐकण्याची आणि इतर भाषातील साहित्य आणि साहित्यिकांना मराठी वाङ्मयाशी जोडण्याची एक चांगली परंपरा जपली गेली होती. यावेळी इंग्रजी साहित्याशी पुन्हा एकदा जवळीक साधण्याची संधी हुकली याबद्दल खंत व्यक्त केली.

संमेलनाचे व्यासपीठ हे वादाचे नसून संवादाचे व्यासपीठ आहे याची जाणीव ठेवली जायला हवी होती. राजकीय मदतीच्या कथित वादाचा समाचार घेतांना शासकीय मदत नाकारायची असेल तर महामंडळाने महाकोष निर्माण करायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संमेलनाच्या व्यासपीठाचे पावित्र्य राखले जायला हवे असेही त्यांनी यावेळी सुनावले.

मराठी साहित्याला मोठी परंपरा असून अनेक मान्यवरांनी हे साहित्य समृद्ध करण्यात योगदान दिले आहे. मात्र यातील अनेकांचे काम विस्मृतित गेल्याबद्दल अरुणा ढेरे यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली. कोणत्याही तत्वज्ञानाशी साहित्यिकाची बांधिलकी नसते त्याची बांधिलकी ही जगण्याशी असते. कलेच्या द्वारे येणारा मुक्ततेचा अनुभव हा कलाकाराचा ध्यास असतो आणि साहित्यिक हाही कलाकारच असतो असे ढेरे यांनी यावेळी सांगितले.

लक्ष्मीकांत देशमुख

कर्‍हाडच्या साहित्य संमेलनात ज्या प्रमाणे दुर्गाबाई भागवतांनी आणिबाणिविरुद्ध आवाज उठवण्याचा तडफदारपणा दाखवला होता तसाच तडफदारपणा नयनतारा सहगल यांनीही दाखवला होता याकडे मावळते संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले.

झाल्या प्रकाराने महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले असून साहित्यिक आणि कलाकारांना बोलू दिले जात नाही असे वातावरण या घटनेमुळे निर्माण झाले असल्याचा दावा करीत या संपूर्ण प्रकरणात साहित्य महामंडळ कमी पडले असा आरोप त्यांनी यावेळी केला.

यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे याकडे लक्ष वेधत साहित्यिकांनीही आपल्या साहित्यातून या शेतकर्‍यांच्या वेदनांची जाणीव समाजाला करून द्यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकर्‍यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या तर आत्महत्या थांबतील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. साहित्यिकांना निरंकुश स्वातंत्र्य या देशात दुर्दैवाने  नाही, याकडे लक्ष वेधतांना नागरी समाजाचा पाठिंबा वाङ्मय विश्‍वाला मिळाल्यास सकस वाङ्मयनिर्मिती होऊ शकेल असेही देशमुख यांनी सांगितले. साहित्यिकांची गळचेपी होत असताना साहित्य महामंडळ गप्प का असा सवालही त्यांनी
यावेळी केला.

महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण महाराष्ट्रच अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या पाठीशी असल्याचा खुलासा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे  यांनी यावेळी बोलतांना केला. निमंत्रण रद्द करण्याच्या प्रकरणात सरकारला गोवू नये असे स्पष्ट करीत सरकारने कधीही अशाप्रकारात प्रतिष्ठेचा प्रश्‍न केला नाही असेही त्यांनी ठणकावले.

साहित्य संमेलनात नयनतारांचे मुखवटे घालून निषेध

ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण मागे घेतल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप सुरूच आहे. संमेलनाला उपस्थित निमंत्रित तीन कवयित्रींनी नयनतारांचे मुखवटे घालून यवतमाळमध्ये निषेध नोंदवला. त्यामुळं संमेलनात काही वेळ गोंधळाची स्थिती होती. संमेलनात स्वागताध्यक्ष मदन येरावार यांचे भाषण सुरू असतानाच, निमंत्रित प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या तीन कवयित्रींनी नयनतारा यांचे मुखवटे घालून निषेध नोंदवला. यानंतर संमेलनाच्या मंडपात थोडा वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. महिला पोलिसांनी त्यांना मुखवटे काढून ठेवण्यास सांगितले. त्यांच्याकडील मुखवटे जप्त करून त्यांना मंडपातून बाहेर काढण्यात आले.