Thu, Aug 13, 2020 16:33होमपेज › Vidarbha › अमरावती जिल्ह्यातील बोराळा गाव झाले जलमय

अमरावती जिल्ह्यातील बोराळा गाव झाले जलमय

Last Updated: Jul 04 2020 12:54PM

बोराळा गावात शिरलेले पावसाचे पाणीनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

अमरावती जिल्ह्यातील बोराळा येथे शुक्रवारी (दि. ४) रोजी सायंकाळी पावसाने हाहाकार केला. या पावसाची अनेकांना झळ पोहोचली असून शेतात तळी साचली आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव जलमय झाल्याचे चित्र गावकऱ्यांनी अनुभवले. 

दर्यापुर तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक ढगफुटी व्हावी असाच काहीसा मुसळधार पाऊस धो-धो कोसळला. तब्बल दोन -तीन तास मुसळधार पाऊस कोसळल्याने आजूबाजूच्या शेतशिवारातील पाणी थेट गावामध्ये घुसले. तसेच पावसाचा जोर वाढत असल्याने नाल्यांना ही महापूर येवून पाणी गावात शिरले. त्यामुळे गावातील अनेकांना यांची झळ पोहोचली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील भांडीकुंडी वाहून गेली. तर काही घरात गाळ साचला आहे. याशिवाय गावातील नागरिक गोविंदा भेले यांच्या घराची भिंत कोसळली. एकनाथराव कुकलकर यांच्या घरात ही पाणी घुसल्याने कंट्रोलचे धान्य खराब झाले. 

वाचा : औरंगाबादमध्ये नवीन १३८ कोरोना रुग्णांची वाढ

आज झालेला पाऊस मूग आणि सोयाबीनसाठी फायदेशीर असला तरी ज्या शेतात पराटीची लागवड झाली त्या शेतात साचलेले पावसाचे पाणी नुकसानकारक ठरू शकते. यानंतर शासनाने तातडीने सर्व्हे करून नुकसान ग्रस्तांना मदत करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर घटनेची माहिती तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांना दिली असता त्यांनी आपण स्वतः गावाला भेट देवून तातडीने सर्व्हे करून नुकसान ग्रस्तांना मदत दिली जाईल अशी माहिती दिली. 

वाचा : कोरोनापासून बचावासाठी चक्क सोन्याचा मास्क 
५० पोते यूरियाचे झाले पाणी

बोराळा येथील पांडुरंग घडेकर यांनी आपल्या शेतीसाठी नुकताच ५० पोते यूरिया गोडावूनमध्ये आणून ठेवला होता. पण आज झालेल्या धो-धो पावसाने त्यांच्या घरात पाऊस शिरला आणि युरियाचे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर तिथे असलेल्या कापसाचे देखील नुकसान झाले.