नागपूर : वृत्तसंस्था
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने गेल्या तीन दिवसांपासून सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. या नदीचे पात्र आज पुन्हा फुगल्याने गावात पाणी शिरल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी शैक्षणिक संस्थांना दोन दिवसांची सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने दिलेला इशारा जिल्ह्यात तंतोतंत खरा ठरला आहे. जिल्ह्यातील 12 पैकी सात तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
वडसा, भामरागड, गडचिरोली, धानोरा, आरमोरी, कुरखेडा, एटापल्ली या तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, यातील वडसा इथं 212 मिमी एवढा प्रचंड पाऊस कोसळला. यापैकी धानोरा तालुक्यातील रांगी येथे लगतचा नाला तुडुंब भरल्याने गावातील रस्ते नद्यांत परिवर्तित झाले आहे. उद्याही अशाच पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे. जिल्ह्याने वार्षिक सरासरी ओलांडली असून आतापर्यंत 18 टक्के पाऊस अधिक झाला आहे. या पावसामुळे आठ प्रमुख मार्ग बंद असून, यात आलापल्ली-भामरागड आणि आरमोरी-वडसा या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. प्रशासन स्थितीवर लक्ष ठेऊन आहे.