Thu, Jan 28, 2021 08:33होमपेज › Vidarbha › शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा : मंत्री बच्चू कडू

शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा : मंत्री बच्चू कडू

Last Updated: Jul 11 2020 7:40PM

संग्रहित छायाचित्रनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

खासगी शिक्षण संस्था चालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यार्थ्यासाठी लागणारी वह्या पुस्तके, गणवेश इ. साहित्य खरेदीची पालकांना सक्ती करता येत नाही. तशी त्यांनी केल्यास त्यांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित संस्थाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज अकोल्यात दिले.

यासंदर्भात शनिवारी अकोला येथे पालकांचे शिष्टमंडळ बच्चू कडू यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी पालकांनी तक्रारीचे निवेदन देऊन संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांना लागणारी वह्या पुस्तके, शालेय गणवेश व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी शाळांकडूनच किंवा शाळेने नेमुन दिलेल्या विक्रेत्याकडूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते, याबद्दल आपली व्यथा मांडली.

त्यावेळी संबंधित पालकांना आश्वस्त करतांना ना. कडू म्हणाले की, शिक्षण संस्थाचालक अशाप्रकारे सक्ती करु शकत नाही. तसा त्यांना अधिकार नाही. आपल्या पाल्यांसाठी आवश्यक शालेय साहित्य, वह्या पुस्तके, प्रयोग वही इ. तसेच अन्य साहित्य हवे तेथून घेऊ शकतात. पालकांनी संस्थाचालकांविरुद्ध संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे निर्देश ना. कडू यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही वेळचे वेळी आढावा घेऊन पालकांच्या तक्रारींचे निराकरण करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.