Tue, Jul 07, 2020 18:06होमपेज › Vidarbha › वाशिम : शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याचे आवाहन

वाशिम : शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याचे आवाहन

Last Updated: Feb 12 2020 8:34AM
वाशिम : प्रतिनिधी 

महात्मा जोतिराव फुले शेतकारी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सर्व कर्ज खात्यांना आधार लिंक करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची एका पेक्षा जास्त बँकेत कर्ज खाती आहेत, अशा शेतकऱ्यांनी प्रत्येक कर्ज खाते आधार लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बँक प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

अधिक वाचा : मोफत विजेबाबत ऊर्जामंत्री ठाम!

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकारी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांना आधार लिंक करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या कर्ज खात्याला आधार लिंक केलेले नाही. तसेच काही शेतकऱ्यांनी एक पेक्षा जास्त बँकेत कर्ज खाते असूनही केवळ एकाच बँकेतील कर्ज खाते आधार लिंक केले असण्याची शक्यता आहे. संबंधित शेतकऱ्याचे आधार लिंक न झालेल्या इतर बँकेतील खात्याची माहिती कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड होवू शकत नाही. त्यामुळे सदर खाते कर्जमुक्तीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शेतकऱ्यांनी एक पेक्षा जास्त बँकेत आपले कर्ज खाते असल्यास अशा सर्व कर्ज खात्यांना आधार लिंक करावे.

अधिक वाचा : वाशिम : 'कोरोना'ची अफवा; पोल्ट्री उद्योग अडचणीत (video)

जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी कर्ज खात्याला आधार लिंक करण्याच्या कार्यवाहीचा बँकनिहाय आढावा घेतला. तसेच आधार लिंक झालेल्या सर्व कर्ज खात्यांची माहिती पुढील दोन दिवसात अपलोड करण्याच्या सूचना केल्या. २० फेब्रुवारीपासून कर्जमाफी पोर्टलवर शेतकऱ्यांच्या याद्या उपलब्ध होणार आहेत. या याद्या संबंधित गावामध्ये, बँकेत व आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर शेतकऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने आपल्या कर्ज रक्कमेचे आधार प्रमाणीकरण करावे लागेल. 

आपले सरकार सेवा केंद्र, संबंधित बँक, विविध सहकारी सेवा संस्था येथे आधार प्रमाणीकरणसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची एकाच दिवशी गर्दी होवून गोंधळ निर्माण होवू नये, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

अधिक वाचा : महिला-मुलांच्या तस्करीत मुंबईचा उच्चांक

अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज न घेतलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. बँकांनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी मोडक यांनी यावेळी केले.