होमपेज › Vidarbha › प्रायोजक, देणगीदारांची यादी जाहीर  करा : शेतकरी न्याय हक्‍क आंदोलन समिती

प्रायोजक, देणगीदारांची यादी जाहीर  करा : शेतकरी न्याय हक्‍क आंदोलन समिती

Published On: Jan 02 2019 1:57AM | Last Updated: Jan 02 2019 1:15AM
नागपूर : प्रतिनिधी

साडेतीन कोटींचे बिग बजेट असलेल्या यवतमाळातील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठ्या प्रमाणात प्रायोजक व दानदाते शोधले जात आहेत. हे बहुतांश संमेलन परभारे निपटण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. त्याचवेळी संमेलनाच्या नावाने शासकीय कर्मचारी, व्यावसायिक प्रतिष्ठाने, विविध संस्था, एवढेच नव्हे तर चक्‍क विद्यार्थ्यांकडूनही वसुली केली जात आहे. आयोजकांचा कारभार खरोखरच पारदर्शक असेल तर त्यांनी संमेलनापूर्वी तमाम प्रायोजक, दानदाते यांची यादी जाहीर करावी आणि एकूणच खर्चाचा हिशेब जनतेसाठी खुला करावा, असे आव्हान शेतकरी न्याय हक्‍क आंदोलन समितीने दिले आहे.

हे संंमेलन प्रचंड थाटामाटात करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असल्याचा समितीचा आरोप आहे.  कुणालाही कशाचीही उणीव राहू नये यासाठी आयोजकांचे कार्यकर्ते राबताना दिसत आहेत. कर्ज व नापिकीपायी शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत असताना या संमेलनावर साडेतीन कोटींपेक्षा अधिक रक्‍कम उधळली जाणार आहे. या उधळपट्टीला समाजाच्या विविध स्तरातून व खुद्द साहित्यिकांमधून विरोध होत आहे. संमेलन जरुर व्हावे, परंतु त्यात साधेपणा असावा आणि संमेलनाच्या नावाने गोळा होणारा पैसा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना द्यावा, अशी भूमिका शेतकरी न्याय हक्‍क आंदोलन समितीने घेतली आहे.

समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी सांगितले की, संमेलनासाठी दरदिवशी पुढे येणारी प्रायोजक व दानदात्यांची नावे पाहता आणि त्याचवेळी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात विविध स्तरातून सुरू असलेली वसूली लक्षात घेता किमान एक कोटी रुपयांची बचत होईल, असे सध्याचे चित्र आहे. कारण संमेलनासाठी आयोजकांना स्वतः फारसा खर्च करावा लागणार नाही.