नागपुरात खासगी रुग्णालयांची होणार आकस्मिक तपासणी

Last Updated: Aug 05 2020 10:15AM
Responsive image
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे


नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या संदर्भात नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांकरिता नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीच्या अंमलबजावणीकरिता भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी (आयएएस) तथा अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात मनपातर्फे विशेष पथक गठीत करण्यात आले आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश दिले आहे.

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात  

नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आता खासगी रुग्णालयांमध्येही तपासणी आणि उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतू हे करताना चाचणी, तपासणी आणि उपचारासाठी शासन आणि प्रशासनाने दर निश्चिती केलेली आहेत. कोविड आणि कोविडसाठी नसलेल्या रुग्णालयांसाठी शासनाची नियमावली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार रुग्णालयातील ८० टक्के बेड राखीव असावेत. २० टक्के बेडसाठी रुग्णालय व्यवस्थापनाच्या दरानुसार दर आकारू शकतात. या सर्व नियमांचे अनुपालन करणे सर्व रुग्णालयांना बंधनकारक आहे. या संदभातील आदेशाची अंमलबजावणी होते अथवा नाही याची पाहणी करून नियंत्रण ठेवण्याकरिता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पथक निर्धारित केले आहे. पथक प्रमुख अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा हे असून पथकाद्वारे शहरातील विविध खासगी रुग्णालयांची आकस्मिक तपासणी केली जाणार आहे.

'आता तुमच्या घराजवळच कोविड टेस्टिंग सेंटर' 

तपासणी करण्यात आलेल्या रुग्णालयांच्या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल मनपा आयुक्तांना सादर करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी खासगी रुग्णालयांकडून दर आकारणी संदर्भात मनपाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. यापुढेही जर असे काही आढळल्यास, शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागरिकांनी मनपाकडे तक्रार करावी. तयार करण्यात आलेले पथक त्याची त्वरित दखल घेईल, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. अशा रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा व अन्य संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.