Sat, Jul 04, 2020 03:36होमपेज › Vidarbha › नागपुरात घोटाळ्यांचा विकास; श्‍वेतपत्रिका जाहीर करा

नागपुरात घोटाळ्यांचा विकास; श्‍वेतपत्रिका जाहीर करा

Published On: Mar 17 2019 1:45AM | Last Updated: Mar 17 2019 1:45AM
नागपूर ः प्रतिनिधी

नागपुरात केवळ घोटाळ्यांचा विकास झाला. विकासाच्या नावावर कोट्यवधींचे कर्ज जनतेवर लादले गेले. महापालिकेच्या कोट्यवधींच्या जागा मेट्रोला दिल्या गेल्या. त्यामुळे सरकारने नागपूरच्या विकासात कुठे, किती खर्च झाला, याचा हिशेब देणारी श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी नागपूर लोकसभेतील काँग्रेसचे उमेदवार, माजी खासदार नाना पटोले यांनी शनिवारी येथे केली.

उमेदवारी जाहीर झाल्यावर पटोले यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस विकासाच्या वल्गना करतात. 80 हजार कोटींच्या विकासाचे दावे त्यांनी केले. हा पैसा नेमका कुठे खर्च झाला, याचा हिशेब त्यांनी जनतेला दिला पाहिजे. नागपूरची मेट्रो बिनकामाची ठरणार आहे. सिमेंटच्या रस्त्यांवरील पाणी लोकांच्या घरात शिरते आहे. 6 जुलैला नागपूर शहराचा अक्षरश: तलाव झाला होता. नेमका कोणता विकास झाला, याचे उत्तर गडकरी यांनी दिले पाहिजे. गडकरी यांनी दिलेल्या आशीर्वादाचे स्वागत करतो, असे सांगताना ते कुठे भेटल्यास नक्कीच आशीर्वाद घेऊ, असे पटोले म्हणाले.

प्रियांका नागपुरात प्रचाराला येणार

काँगे्रसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी या 4 किंवा 6 एप्रिल रोजी नागपुरात प्रचारासाठी येणार असल्याची माहिती पटोले यांनी यावेळी दिली. नागपुरात त्या जाहीर सभा घेतील, असे त्यांनी सांगितले.