Sat, Oct 24, 2020 09:22



होमपेज › Vidarbha › नागपूर : १६ खासगी रुग्णालयांना दणका

नागपूर : वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना नोटीस

Last Updated: Oct 23 2020 1:24AM

संग्रहीत फाेटाे



नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

नागपुरात कोरोना रुग्णांवर ज्या खासगी रुग्णालयांत उपचार होत आहे अशा काही रुग्णांलयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केली जात आहे. अशा नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच जादा आकारलेली रक्कम रुग्णांना परत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नोटीस बजावण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये न्यूक्लिअस मदर ॲण्ड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (छत्रपती चौक), ओरियस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, ग्रेस ऑर्थो हॉस्पिटल (रविनगर), मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (कोराडी रोड), सेनगुप्ता हॉस्पिटल (रविनगर), सुश्रुत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, (रामदासपेठ), सेंट्रल हॉस्पिटल (रामदासपेठ), गंगा केअर हॉस्पिटल (रामदासपेठ), समर्पण हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इंस्टिट्यूट (रामदासपेठ), सिम्स हॉस्पिटल (बजाजनगर), एव्हर शाईन हॉस्पिटल, श्री भवानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट ट्रस्ट (पारडी), सेव्हन स्टार हॉस्पिटल (ग्रेट नागरोड), सनफ्लॉवर हॉस्पिटल, विवेका हॉस्पिटल, झेनिथ हॉस्पिटल यांचा समावेश आहे.

कोविड रुग्णांवर उपचार करताना खासगी कोव्हिड हॉस्पीटलसाठी शासनाने दरसूची जारी केली आहे. त्यानुसार रुग्णांकडून बिलाची आकारणी होते किंवा तसे नसेल तर यासाठी प्रत्येक हॉस्पीटलमध्ये पूर्व अंकेक्षक नेमण्यात आलेला असतो. या अंकेक्षकांकडून बिलाचे अंकेक्षण करण्यात येते. दरम्यान, या सर्व हॉस्पिटलच्या बिलाचे अंकेक्षण केले असता शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने आकारणी केल्याची बाब उघडकीस आली आहे. काही रुग्णालयांनी पीपीईकिटचे दर शासन दरापेक्षा अधिक लावला आहे. तसेच काही रुग्णालयांनी बेडचे दर फिजिशीयन व्हिजीट दर अधिक लावले असे निर्दशनास आले आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याची गंभीर दखल घेतली. तातडीने या हॉस्पिटलना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहे. अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सदर सर्व १६ हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावून रुग्णांकडून अतिरिक्त वसूल केलेली रक्कम तातडीने रुग्णांना परत करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यवाहीमुळे खासगी हॉस्पिटलना दणका बसला असून रुग्णांना मात्र दिलासा मिळाला आहे.
 अधिक वाचा 

कोल्हापूर : बेले येथील खून प्रकरणी सख्ख्या भावांना जन्मठेप        

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवारांचा मोठा खुलासा





 







"