Tue, Jul 14, 2020 11:56होमपेज › Vidarbha › गडकरींची तुकाराम मुंढेंविरोधात थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार

गडकरींची तुकाराम मुंढेंविरोधात थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार

Last Updated: Jun 30 2020 7:09PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ होण्याची चिन्हे आहेत. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही मुंढे विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेन्द्रसिंह आणि केेंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी यांना मंगळवारी (दि. ३०) पत्र लिहून तक्रार केली आहे. 

दारू न मिळाल्याने पिले सॅनिटायझर, पालिकेच्या कर्मचार्‍याचा मृत्यू

नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदाचा गैरवापर करीत केंद्र सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा बट्ट्याबोळ चालविला असल्याचा आरोप गडकरी यांनी लिहिलेल्या पत्रात केला आहे. आयुक्त मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बेकायदेशीर, असंवैधानिक आणि कपटी वृत्तीने गैरव्यवहार चालविले आहेत, त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडकरी यांनी या पत्रात केली आहे. महापौर संदीप जोशी यांनी मुंढे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीची प्रत या पत्राला जोडण्यात आली आहे. 

अधिक वाचा :'लॉकडाऊन'वरून फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा  

मुंढे विरोधात भाजप आमदार एकवटले

नागपूर महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाई करावी यासाठी आता नागपुरातील सर्व भाजप आमदार एकवटले आहेत. या आमदारांनी एकत्रीत येत पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना मंगळवारी निवेदन दिले. स्मार्ट सिटी प्रकल्पअंतर्गत मार्जितल्या कंत्राटदारांना २० कोटी रुपये दिल्याचा आरोप मुंढे यांच्यावर आहे. या संदर्भात महापौर संदीप जोशी यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आली नसल्यानं कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजप आमदारांनी पोलिस आयुक्तांना दिले आहे. नागपुरातील कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, नागो गाणार, गिरीश व्यास, विकास कुंभारे, मोहन मते या भाजप आमदारांनी मुंढे विरोधात हे निवेदन दिले आहे.

अधिक वाचा :नागपुरातील मनपाच्या पाच रुग्णालयांचा कायापालट