Sun, Dec 08, 2019 08:20होमपेज › Vidarbha › अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही 

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही 

Published On: Feb 24 2019 1:28AM | Last Updated: Feb 24 2019 1:20AM
नागपूर : प्रतिनिधी

अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर चर्चा होतेय. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजी करण्याची गरज नाही. आजवर आम्ही अनेक आक्रमणे पचवली. ज्या संस्कृतीने ही आक्रमणे पचवली त्याच सांस्कृतिक जगतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाद झाले. हे वाद गरजेचेही आहेत. मात्र काळजी करावी अशी परिस्थिती नाही, असे खडे बोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शनिवारी सुनावले. 

उद्घाटन समारंभास काही कामानिमित्त उपस्थित न राहू शकल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार 23 रोजी सायंकाळी  7 वाजता आवर्जून उपस्थित राहून राम गणेश गडकरी नगरीत साजर्‍या होत असलेल्या 99 व्या नाट्य संमेलनात रंगकर्मी आणि नागपूरकरांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही समतेचे पाईक आहोत. मात्र ज्या कुणाविरुद्घ देशविरोधी कारवायांचे पुरावे मिळतील त्यांच्यावर कारवाई करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आम्ही कदापि संविधानाच्या विरोधात काम करणार नाही. त्यामुळे सहिष्णुतेसंदर्भात सरकारबद्दल गैरसमज नसावा. 

आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी विदर्भातील नाट्यचळवळीची आणि   नागपूरकर रसिकांची तोंडभर स्तुती केली. ते म्हणाले , विदर्भाची नाटकाची  : भूक ही कायम आहे. झाडीपट्टी जोपासण्याचे काम विदर्भातील कलाकार करीत आहेत.मराठी रंगभूमी ही समृद्ध आहे. त्यासाठी रसिकांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. 34 वर्षानंतर नागपुरात नाट्य संमेलन होत आहे. पुढील वर्ष हे 100 वे आहे. जर 100 वे नाट्यसंमेलन भरविण्याची संधी दिली तर नागपूरकर निश्‍चितच त्याचे स्वागत करतील, अशा शब्दांत त्यांनी शतकोत्सवी नाट्यसंमेलनाचे निमंत्रणच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला दिले. 

शनिवारी सायंकाळी 6 वाजता नाटक जगण्याची समृद्ध अडगळ हा परिसंवाद जेष्ठ नाटककार शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद सादर झाला. या परिसंवादात अतुल पेठे, आशुतोष पोतदार, विभावरी देशपांडे आणि वामन केंद्रे यांचा सहभाग होता. या परिसंवादास सुरेश भट नाट्यगृह ओव्हर पॅक होते. रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकार यांच्या लोकनाट्य तमाशा राम गणेश गडकरी नगरीत नागपूरकरांनी तोबा गर्दी केली होती.