Fri, Jul 03, 2020 23:07होमपेज › Vidarbha › पवारांना वार्‍याची दिशा कळलीच असेल: देवेंद्र फडणवीस

'पवारांना पक्षात घेतल्यास टीका कोणावर करायची'

Published On: Mar 16 2019 9:09AM | Last Updated: Mar 16 2019 9:36AM
अमरावती : पुढारी ऑनलाईन

भाजप-शिवसेना युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे, ती कधीही तुटणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला. पंतप्रधान मोदी नेहमी म्हणतात, शरद पवार यांनावार्‍याच्या दिशेचा अंदाज येतो. आता पवार यांना खरेच वारे कुठे वाहत आहे ते कळलेच आहे, असे म्हणत शरद पवारयांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी अंबानगरी अमरावती येथील संत संस्कृती भवनात फोडण्यात आला. आरंभाच्या पहिल्याच प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री म्हणाले, जनआरोग्य योजनेचा लोकांना फायदा होत आहे. गरिबाला या योजनेचा फायदा होत आहे. शेतकर्‍यांसाठी सहा हजारांची योजना सरकारने आणली आहे. 10 हजार किलोमीटरचे रस्ते राज्य सरकारने केले आहेत. 18 हजार गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आम्ही निकाली काढला आहे. 27 टक्के उद्योग केवळ महाराष्ट्रामध्ये उभारले गेले आहेत. 

मग आम्ही टीका कोणावरकरायची : उद्धव ठाकरे 

आम्ही ज्या विरोधकांवर टीका करतो, ते सरळ भाजप किंवा सेनेत प्रवेश करत आहेत. शरद पवारांना फक्त तुमच्या-आमच्या पक्षात घेऊ नका, अशी जाहीर टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये केली आहे. सगळे विरोधक आपल्या पक्षात येतील तर टीका करायची कोणावर? असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी विरोधकांची चांगली फिरकी घेतली. 

उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला सत्ता नेत्यांसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी नको. शासनाच्या या सार्‍या योजना तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्यात आडकाठी आणणार्‍या यंत्रणेतील शुक्राचार्यांना धडा शिकवला जावा, हीच आमची सातत्याने मागणी होती. या मागणीसाठी आम्ही आवाज काढला, याचा अर्थ आता युती संपणार असे नव्हता. देशात भगवा फडकावा हेच आमचे ध्येय आहे आणि नरेंद्र मोदी हेच कार्य करत असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान आहे. 

पूर्वी हिंदू म्हणजे शिवी वाटायची, आज हिंदू असल्याचा गर्व बाळगला जातो. हे सगळे जुनी सत्ता उलथवून टाकल्यानेच शक्य झाले. आज बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी हयात असते, तर त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फलित होत असल्याचे पाहून त्यांना फार आनंद झाला असता, असेही ते म्हणाले.