Mon, Mar 08, 2021 19:01
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : मंत्री राठोडांच्या शक्तीप्रदर्शनात नियमांचा उडाला फज्जा, पोलिसांची दमछाक 

Last Updated: Feb 23 2021 3:18PM

वाशिम : पुढारी वृत्तसेवा

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड 23 फेब्रुवारी रोजी बंजारा समाजाची काशी पोहरागडावर प्रकटले. या ठिकाणी त्यांच्या हजारो समर्थकांकडून करण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शनात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला पायदळी तुडविण्यात आल्याने कायदा केवळ सर्वसामान्यांसाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यातील शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील एका इमारतीवरुन उडी घेत टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या युवतीने आत्महत्या केली. यानंतर अवघ्या काही तासांत समाजमाध्यमांवर मंत्री राठोड व अरुण नामक युवकाच्या मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर मंत्री राठोड यांचा या प्रकरणाशी संबध जोडून त्यांच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून केली गेली. मात्र, तेव्हापासून मंत्री राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर येवून खुलासा सादर केला नाही व मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे या घटनेमागील रहस्याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. 

दरम्यान, मागील  दोन आठवड्यांपासून मंत्री संजय राठोड यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने राठोड आहेत तरी कोठे असा प्रश्न निर्माण झाल असताना अचानक राठोड यांच्या मंगळवारच्या शासकीय दौर्‍याची माहिती मिळाली. त्यामुळे प्रसारमाध्यमांना पूजा मृत्यू प्रकरणाबाबत ते खुलासा करतील अशी अपेक्षा होती. परंतू संजय राठोड हे सपत्नीक आई जगदंबा, सेवालाल महाराज व रामराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले असता राठोड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलीस प्रशासनाच्या नाकीनऊ आल्याचेही दिसून आले. 

वनमंत्री राठोड यांनी प्रसारमाध्यमांना सामोरे जाताना या घटनेचे विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. सोबतच राठोड कुटुंब व बंजारा समाजाची बदनामी थांबविण्याचे माध्यमांना आवाहन केले. तसेच तपासाअंती घटनेतील सत्यता समोर येईल असे विधान करुन तेथून त्यांनी काढता पाय घेतला. दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जमावबंदी व सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू करण्यात आली. यावेळी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच मंदिर प्रशासनाला 50 पेक्षा अधिक लोकांची गर्दी होवू न देण्याच्या सूचना असताना हजारो समर्थक एकत्र आल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

वाचा : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अखेर संजय राठोडांनी सोडले मौन, म्हणाले...

वाचा : संजय राठोड यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते रस्त्यावर; राठोड अजूनही विरोधकांच्या रडारवर!