Fri, Nov 27, 2020 11:17होमपेज › Vidarbha › नागपूरमधील शाळा उद्या सुरु होणार नाहीत

नागपूरमधील शाळा उद्या सुरु होणार नाहीत

Last Updated: Nov 22 2020 10:23AM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपूर जिल्ह्यात दिवाळी पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता. शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबर पासून स्थानिक प्रशासनाच्या संमतीने सुरू करता येतील असे आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यासंदर्भात मनपाने तयारी केली होती. 

मात्र दिवाळी नंतर कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता २३ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या शाळा सध्या सुरू न करता १३ डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्यात येतील, असा आदेश नागपुरचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी उशीरा रात्री जारी केला आहे. हा आदेश केवळ महानगरपालिकेच्याच शाळा नव्हे तर नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांसाठी लागू असेल. 

शाळा बंद राहणार असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत सुरू राहिल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पूर्वनियोजित सुरू असणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरू ठेवण्यात येतील. उपरोक्त आदेश नागपूर महानगरपालिका क्षेत्रात १३ डिसेंबर पर्यंत अंमलात राहतील, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशात म्हटले आहे.