Wed, Jul 08, 2020 10:59होमपेज › Vidarbha › नागपूरच्या सावनेरात 1 कोटीची रोकड जप्‍त

नागपूरच्या सावनेरात 1 कोटीची रोकड जप्‍त

Published On: Mar 30 2019 1:32AM | Last Updated: Mar 30 2019 12:26AM
नागपूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सावनेर तालुक्यात आतापर्यंत झालेल्या विविध कारवाईत एक कोटी पाच लाखांची रोख रक्‍कम जप्‍त करण्यात आली आहे. ती कोणाची होती, कोणासाठी नेली जात होती, याची माहिती अद्याप प्राप्तिकर विभागातर्फे जिल्हाधिकारी वा निवडणूक अधिकार्‍यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे या कारवाईवरच शंका व्यक्‍त केली जात आहे.

नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत चार ठिकाणी रोख रक्‍कम सापडली. यापैकी तीन कारवाया सावनेर तालुक्यात झाल्या. पहिल्या कारवाईत 30 लाख रुपये, दुसर्‍यात 50 लाख, तर तिसर्‍या कारवाईत 25 लाख रुपये सापडले. रामटेक तालुक्यात सात लाखांची रोकड मिळाली होती. रामटेक तालुक्यातील मिळालेली रोकड व्यापार्‍यांची असल्याचे सांगण्यात आले. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर दुसर्‍याच दिवशी रोकड सोडण्यात आली. सावनेर तालुक्यातील तीन कारवाईत एक कोटी पाच लाखांची रोकड मिळाली. याची चौकशी प्राप्तिकर विभाग करीत आहे. 25 लाख रुपये तीन दिवसांपूर्वी सापडले. तर 30 लाख आणि 50 लाखांची रोकड पकडून दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. निवडणुकीसाठी ही रक्‍कम नेली जात असल्याचे प्राप्तिकर विभागातर्फे सांगण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक अधिकारी या नात्याने सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करणे अपेक्षित आहे. ती दिली जात नसल्याने शंका व्यक्‍त केली जात आहे. ही रक्‍कम निवडणुकीच्या कामात वापरण्यात येणार होती? का हा काळा पैसा आहे, याचाही खुलासा झाला नाही.