Wed, Jul 15, 2020 16:10होमपेज › Vidarbha › अपघातवार; २१ ठार

अपघातवार; २१ ठार

Published On: May 21 2019 1:50AM | Last Updated: May 21 2019 1:50AM
बुलडाणा / नाशिक, पुढारी वृत्तसेवा

सोमवारचा दिवस राज्यासाठी अपघातवार ठरला. मलकापूर, साक्री, नाशिक आणि मुंबई-पुणे हायवेवर झालेल्या विविध अपघातांमध्ये 21 जण ठार, 23 जण जखमी झाले. मलकापूर येथे भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने टाटा मॅजिकला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 13 ठार झाले. साक्रीजवळ काँग्रेसचे आमदार डी. एस. अहिरे यांच्या कारने उडविल्यामुळे दोन जण, मुंबई - पुणे हाय वे वर दोन बसमध्ये टक्‍कर होऊन दोन जण मरण पावले. दिवसभरात झालेल्या या तीन अपघातांशिवाय रात्री उशिरा सप्‍तशृंगी गडाचे दर्शन घेऊन परतणार्‍या चार भाविकांचा ट्रकने उडविल्यामुळे मृत्यू झाला.
मलकापूर शहरानजीक रसोया ऑईल फॅक्टरीसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजता ट्रकने टाटा मॅजिकला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 13 जण जागीच ठार, तीन जण गंभीर जखमी झाले. मुंबईकडून नागपूरकडे स्फोटक साहित्य घेऊन जात असलेल्या ट्रकचे (एमएच 40, बीजी 9112) समोरील चाकाचे टायर फुटल्याने ट्रक समोरून येणार्‍या टाटा मॅजिक गाडीवर (एम एच46, एक्स 7925) धडकला. ही धडक एवढी भीषण होती की, ट्रकखाली गाडी पूर्णपणे दबली गेली. गाडीमधील मृत आणि जखमींना बाहेर काढणेही अवघड गेले. अपघाताची माहिती कळताच नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ, उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीश बोबडे, पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. क्रेनच्या मदतीने त्यांनी दोन्ही वाहने वेगळी केल्यानंतर गाडीतील मृत, जखमींना बाहेर काढले. 

या अपघातात मरण पावलेल्यांची नावे अशी : अनिल मुकुंद ढगे (35, गाडीचा चालक), छाया गजानन खडसे (30), अशोक लहू फिरके (40), किसन सुखदेव बोराडे (30), नथू वामन चौधरी (45, सर्व राहणार अनुराबाद, ता. मलकापूर, जि. बुलडाणा), सोमीबाई छगन शिवरकर (25), वीरेन छगन बिलोरकर (सहा वर्षे), सतीश छगन शिवरकर (आठ वर्षे), रेखा (17), आरती (18),  मीनाबाई गोकुळ बिलोरकर (30, सर्व राहणार बेगनार, जि. बर्‍हाणपूर), प्रकाश किसन भारंबे,     मेघा प्रकाश भारंबे (राहणार जामनेर). गोकुळ भालचंद्र बिलोरकर (35, रा. नागझरी), छगन राजू शिवरकर (26), रोहित नथू चौधरी (वय तीन, रा. अनुराबाद) ही जखमींची नावे आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.

दुसरा अपघात साक्री-पिंपळनेर मार्गावर धाडणे फाट्यावर घडला. काँग्रेसचे आमदार डी. एस. अहिरे यांच्या कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना घडली. अपघातानंतर मृत तरुणांना नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी काही तरुणांनी संतप्त भावना व्यक्‍त केल्या. परंतु, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत केले. त्यानंतर जखमी झालेल्या आमदार अहिरे व चालकास रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे हे त्यांच्या इनोव्हा कारने (क्र. एमएच-18-एपी-565) साक्रीहून पिंपळनेर शहराकडे जात होते. त्यांचे वाहन धाडणे फाट्याजवळ आले. यावेळी समोरून अचानक एक दुचाकी (क्र. एमएच-18-एबी-1608) आल्याने कारचालकाला वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे कारची दुचाकीला जोराची धडक बसली. धडक इतकी जोरात होती की, दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात मलांजन येेथे राहणारे सोनू दयाराम सोनवणे (53) व शांताराम दयाराम सोनवणे (50) हे दोघे जागीच ठार झाले. मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ  मिनी बस आणि लक्झरी बसमध्ये धडक झाली. या भीषण अपघातात 2 जण ठार झाले, तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृत व्यक्ती हे वसईत राहणारे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, खालापूरजवळ सोमवारी सकाळी पावणेआठ ते आठ वाजताच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त मिनी बस महाबळेश्वरकडे जात होती. येथील बोगद्याजवळ मिनी बस लक्झरी बसवर आदळली. या अपघातात वसईचे रहिवासी जोसेफ सरेजा आणि बसचालक शेखर कांबळे हे दोघे ठार झाले.

सप्‍तशृंगीहून परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला

नाशिक : नाशिक रस्त्यावरील कृष्णगाव येथे भाविकांच्या कारला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी रात्री घडला.

या अपघातात तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. भाविकांची आयशर गाडी नादुरुस्त होती, त्यामुळे रस्त्याच्या कडेला ही कार पार्क करण्यात आली होती. मात्र, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. मुलाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर येथील माणिक ठाकूर हे त्यांच्या 25 ते 30 नातेवाईकांसह रविवारी सप्तशृंगी गडाकडे रवाना झाले होते. त्यासाठी त्यांनी आयशर कार बुक केली होती. दुपारी दीड वाजता धार्मिक कार्यक्रम उरकल्यानंतर रात्री साडेआठ वाजता ठाकूर कुटुंबीय परतीच्या प्रवासाला निघाले होते. रात्री नऊ वाजता नांदुरी येथे आल्यानंतर त्यांची कार बंद पडली. काही वेळानंतर कार दुरुस्त करून ती सुरू करण्यात आली. त्यानंतर पुन्हा दोन किलोमीटर अंतरावर गाडी बंद पडली. त्यानंतर पुन्हा रात्री 12 वाजेच्या सुमारास दहा किलोमीटर अंतरावर वणी-नाशिक मार्गावरील कृष्णगाव येथे ही कार बंद पडली. त्यामुळे दुसर्‍या कारची व्यवस्था करण्यासाठी आठ ते दहा भाविक कारच्या खाली उतरले. दुसर्‍या कारची वाट पाहत असतानाच वणीहून नाशिकच्या दिशेने येणार्‍या एका मालवाहू ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातामुळे कारच्या मागे उभे असलेले गणेश भगवती प्रसाद ठाकूर, कुणाल कैलास ठाकूर, सागर अशोक ठाकूर आणि आशिष माणिक ठाकूर हे चार जण जागीच ठार झाले.