Fri, Nov 27, 2020 11:32होमपेज › Vidarbha › वीज बिलमाफी प्रस्तावाची फाईल एका मंत्र्याने दाबली : आंबेडकर यांचा आरोप

वीज बिलमाफी प्रस्तावाची फाईल एका मंत्र्याने दाबली : आंबेडकर यांचा आरोप

Last Updated: Nov 21 2020 10:32PM

वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरअकोला : पुढारी वृत्तसेवा

कोरोना काळातील वीज बिलांपैकी 50 टक्के रक्‍कम माफ करता येईल, असा प्रस्ताव महावितरण कंपनीने दिला होता. मात्र, या प्रस्तावाची फाईल एका मंत्र्याने दाबली, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केला. मात्र, हा मंत्री कोण, याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. 

अकोला दौर्‍यावर असताना पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कोरोना काळात टाळेबंदीमुळे अनेक उद्योग बंद होते. अगदी घरगुती विजेचा वापरही कमी होता. असे असताना वाढीव बिले येतात कशी? या काळात अनेकांचे रोजगार गेले. 

अनेकांचे उत्पन्‍नाचे साधन नाहीसे झाले. त्यामुळेच या काळातील वीज बिल माफ करावे किंवा त्यात सवलत मिळावी, अशी मागणी होती. आधी ऊर्जामंत्रीही सकारात्मक होते. मात्र, आता ते उचित असेल तर आलेले सर्व वीज बिल भरावेच लागेल, असे सांगत आहेत. एकीकडे, वीज बिलमाफीबाबत प्रस्ताव दिला असताना त्यावर विचार न करता एका मंत्र्यामुळे राज्यात कोरोनामुळे त्रस्त जनतेला वाढीव बिले भरावी लागणार आहेत, हे मुख्यमंत्र्यांनीच लक्षात घ्यावे. राज्याचा कारभार नेमके कोण चालवते, असे विचारतानाच अ‍ॅड. आंबडेकर यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.