Sat, Jul 04, 2020 07:32होमपेज › Vidarbha › अपघातातून बरे झालेले १६ मजूर झारखंडला रवाना

अपघातातून बरे झालेले १६ मजूर झारखंडला रवाना

Last Updated: May 25 2020 7:34PM

संग्रहित छायाचित्रनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

यवतमाळ जिल्ह्य़ात स्थलांतरीत मजुरांना नागपूरला घेऊन जाणाऱ्या बस अपघातात जखमी झालेले १६ मजुर उपचारानंतर पुर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना आज (दि.२५) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली. तसेच त्यांच्या गृहराज्यात झारखंडला या मजुरांना पाठविण्यासाठी येथील जिल्हा प्रशासनाने विशेष व्यवस्थासुध्दा केली. 

गत आठवड्यात १९ मे रोजी सोलापूरवरून नागपूरला स्थलांतरीत मजुरांना घेऊन जाणा-या बसचा आर्णी तालुक्यातील कोळवण येथे अपघात झाला होता. या अपघातात चार जण ठार तर २८ जण जखमी झाले होते. जखमींमध्ये झारखंडचे १९ मजूर, छत्तीसगडचे आठ आणि मध्यप्रदेशचे तीन असे एकूण ३० जण आणि दोन चालक होते. सर्व जखमींना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आल्यावर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यापैकी १६ मजूर उपचाराअंती पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना झारखंड राज्यातील पलामू जिल्ह्यात विशेष व्यवस्थेने रवाना करण्यात आले.

अपघताची माहीती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. तसेच जिल्हा प्रशासन अपघातात जखमींची पूर्ण काळजी घेईल, कोणतीही कमतरता जाणवू देणार नाही, आवश्यक सर्व बाबी प्रशासनाकडून करण्यात येईल, तसेच बरे झाल्यानंतर आपापल्या राज्यात जाण्यासाठी येथील प्रशासन सहकार्य करेल, असे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. आठवडाभर जखमींवर उपचार केल्यानंतर १६ मजुरांना महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली. जातांना सर्व मजुरांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच येथील डॉक्टरांचे आभार मानले.