Thu, Dec 03, 2020 06:25होमपेज › Sports › संजू सॅमसनची टीम इंडियात वर्णी; पंत गॅसवर

संजू सॅमसनची टीम इंडियात वर्णी; पंत गॅसवर

Last Updated: Oct 26 2020 11:23PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बीसीसीआयने पुढील ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० संघाची सोमवारी (दि.२६) घोषणा केली. या संघातील मोठा बदल म्हणजे यष्टीरक्षक म्हणून टी-२० संघात संजू सॅमसनाला टीम इंडियात घेण्यात आले आहे. शिवाय एकदिवसीय मध्ये ती जबाबदारी केएल राहूलवर सोपवली आहे आणि कसोटीमध्ये रिषभ पंत सोबत वृद्धिमान साहाला संधी देण्यात आल्याने  पंत वर टांगती तलवार राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदाच्या आयपीएल मध्ये धोनीची जागा कोण घेणार याचा शोध निवडसमितीला घ्यायचा होता. राजस्थानकडून खेळणाऱ्या संजू सॅमसन यंदाच्या हंगामात फलंदाजीत चांगली चमक दाखवून निवडसमितीवर प्रभाव टाकला. पण, असा प्रभाव ऋषभ पंतला टाकता आला नाही. त्यामुळे धोनीची जागा सॅमसनच घेणार अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी-२० संघात यष्टीरक्षक म्हणून पंत ऐवजी सॅमसनची निवड झाली. पंतसाठी हा एक संकेत असून कसोटीत जर त्याने चांगली कामगिरी केली नाही तर त्याची टीम इंडियाच्या सर्व प्रकारामधून गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे कसोटी संघातही त्याचे यष्टीरक्षक म्हणून दुय्यमच स्थान आहे. कारण, विराट कोहली ऑस्ट्रेलिया सारख्या खडतर दौऱ्यावर वृद्धीमान साहालाच विकेटच्या पाठीमागची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.