इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा

Last Updated: Jan 13 2021 6:13PM
कोलंबो : पुढारी ऑनलाईन 

इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा करण्यात आली. दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजचे संघात पुनरागमन झाले आहे. मॅथ्यूज दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील कसोटी मालिकेला मुकला होता. मात्र आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या २२ सदस्यीय संघात त्याला समाविष्ट करण्यात आले आहे.

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील आगामी दोन सामन्यांची कसोटी मालिका श्रीलंकन भूमीवर खेळवली जात आहे. या मालिकेला १४ जानेवारीपासून सुरुवात होईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत ही मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामने गॉल येथे खेळवण्यात येणार असून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीतच ही मालिका खेळली जाईल.

मॅथ्यूजचा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी संघात सहभागी करण्यात आले होते. मात्र, एका स्थानिक टी-२० स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्याने त्याला या दौऱ्याला मुकावे लागले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात नुवान प्रदीप, रोशन सिल्वा आणि लक्षण संदाकन यासारख्या खेळाडूंना स्थान दिले आहे. याशिवाय नवोदित खेळाडू रमेश मेंडीसला देखील संघात स्थान मिळाले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या संघातील धनंजय डी सिल्वा, कसुन रजिथा, संतुष गुनतिलके आणि दिलशान मधुशनाका यांना संघातून डच्चू देण्यात आला आहे.

श्रीलंकेचा संघ :

दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), कुशल जनिथ परेरा, दिनेश चंडीमल, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, ओशादा फर्नांडो, निरोशन डिकवेला, मिनोद भानुका, लाहिरु थिरिमाने, लसिथ एम्बुलदेनिया, वनिंदु हसरंगा, दिलरुवान परेरा, सुरंगा लकमल, लाहिरु कुमारा, विश्वा फर्नांडो, दुश्मंथा चमीरा, दसुन शनाका, असिथा फर्नांडो, रोशन सिल्वा, लक्षण संदाकन, नुवान प्रदीप आणि रमेश मेंडिस.