Fri, Apr 23, 2021 14:42
आयपीएलमध्ये खेळण्यावरुन शाहिद आफ्रिदी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावर संतापला 

Last Updated: Apr 08 2021 12:47PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने दक्षिण आफ्रिका मंडळावर (सीएसए) जोरदार टीका केली आहे. पाकिस्तान विरोधात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु असतानाच सीएसएने आपल्या काही स्टार खेळाडूंना उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२१ मध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यावरुन शाहिद आफ्रिदी सीएसएवर संतापला आहे.

वाचा : ‘ट्रकभर पुरावे’, ‘पाठीत खंजीर’ ते... शरद पवारांवरील आरोपांचे पुढे काय झाले?

यजमान दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्विंटन डी कॉक आणि पेसर कगीसो रबाडा सारख्या स्टार खेळांडूशिवाय मैदानात उतरला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेला २८ धावांनी हरवले आणि ३ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. पाकिस्तानने ३२० धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेचा खेळ ३ चेंडू शिल्लक असतानाच २९२ धावांवर आटोपला. 

वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोनावरील लसीचा दुसरा डोस 

या पार्श्वभूमीवर आफ्रिदीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत म्हटले आहे की ''एकदिवसीय मालिका सुरु असतानाच सीएसएने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळांडूना परवानगी दिली. हे पाहून आश्चर्यचकित झालो. टी-२० लीगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम होत आहे हे पाहून वाईट वाटते. यावर काहीतरी पुनर्विचार करणे आवश्यक आहे!!.''

आयपीएलचे १४ वे सत्र उद्या ९ एप्रिलपासून सुरु होत आहे. पहिली लढत  मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात होणार आहे.

वाचा : कोरोनाची परिस्थिती गंभीर; धैर्याने सामोरे जावू; शरद पवार यांनी केले आवाहन