Sat, Jul 04, 2020 08:08होमपेज › Sports › हिटमॅन रोहितचा आणखी एक विक्रम

हिटमॅन रोहितचा आणखी एक विक्रम

Last Updated: Jan 29 2020 4:17PM
हॅमिल्टन : पुढारी ऑनलाईन 

हॅमिल्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेच्या तिसऱ्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्माने आणखी एक पराक्रम आपल्या नावे केला. टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहितने आजच्या सामन्यात सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून केवळ 3 भारतीय फलंदाज 10,000 किंवा त्याहून अधिक धावा करू शकले आहेत.

रोहितच्या अगोदर ही कामगिरी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर आहे. सलामीवीर म्हणून गावसकर यांनी 12, 258 धावा केल्या आहेत. सेहवागने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही 16119 धावा केल्या आहेत, तर सलामीवीर म्हणून सचिनने एकदिवसीय सामन्यात विक्रमी 15310 केल्या आहेत.

रोहितच्या 361 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 13896 धावा आहेत. त्याने आतापर्यंत 39 शतके आणि 73 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने सलामीवीर म्हणून 219 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना एकूण 10017 धावा केल्या आहेत. रोहितने 105 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 शतके आणि 20 अर्धशतके झळकावत 2710 धावा केल्या आहेत. 

भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेच्या पहिल्या टी -20 सामन्यात न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यातही दणदणीत विजय मिळवला.  5 सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.