Wed, Jan 27, 2021 09:30होमपेज › Sports › मायदेशात रोहित डॉन ब्रॅडमनपेक्षाही लय भारी!

मायदेशात रोहित डॉन ब्रॅडमनपेक्षाही लय भारी!

Last Updated: Oct 20 2019 7:52PM
रांची : पुढारी ऑनलाईन 

रांची येथे सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दमदार द्विशतक ठोकले. रोहितचे हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील तिसरे शतक आहे. रोहित कसोटीत नव्या सलामीवीराच्या भुमिकेत आल्यापासून त्याने धावांचा पाऊस पडण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतके ठोकली. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत २१२ धावा करत द्विशतकच ठोकले. या द्विशतकाबरोबरच त्याने अनेक रेकॉर्ड केले. यातील सर्वात महत्वाचे रेकॉर्ड म्हणजे त्याने सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकला. 

भारताने तिसऱ्या कसोटीत ४९७ धावांचा डोंगर उभारला. यात मोलाचा वाटा उचलला तो हिटमॅन रोहित शर्माने. त्याने द्विशतक (२१२) ठोकत या मालिकेत दोन शतके आणि एक द्विशतक केले. याचबरोबर त्याने अनेक विक्रमही प्रस्थापित केले. आज त्याने ब्रॅडमन यांचा मायदेशातील १० पेक्षा जास्त कसोटी डावात ९८.२२ च्या सरासरीने धावा करण्याचा विक्रम मोडला. रोहितने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात २१२ धावा केल्या. त्यामुळे मायदेशातील सरासरी ९९.८४ वर पोहचली. रोहितने गेल्या १८ कसोटी डावात १ हजार २९८ धावा केल्या आहेत. यात सहा शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. यात नाबाद ८२, नाबाद ५१, नाबाद १०२, ६५, नाबाद ५०, १७६, १२७, आणि २१२ धावांचा समावेश आहे. 

रोहित शर्माने आतापर्यंत ३० कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४६.९५च्या सरासरीने २ हजार १९ धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत १९ षटकार मारुन एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. आधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या हेटमायरच्या नावावर होता. त्याने २०१८-१९ च्या बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत १५ षटकार मारले होते.