नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत. ११ वर्षापूर्वी आजच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला सचिन तेंडुलकरने असा एक विश्वविक्रम केला आहे की जो अजूनपर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहली जो सचिनचे एका पाठपाठ एक विक्रम मोडत निघाला आहे. त्याच्यापासूनही हा विश्वविक्रम 'कोसो दूर' आहे.
सचिनने २० नोव्हेंबर २००९ ला अहमदाबाद कसोटीत श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात हा विक्रम केला होता. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. आतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३० हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे. सचिनने हा विश्वविक्रम श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील अखेरच्या दिवशी केला होता.
विशेष म्हणजे सचिनने हा विक्रम करुन तब्बल ११ वर्षे लोटली आहेत पण, अजूनही त्याचा हा विश्वविक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. विराट कोहली जो सचिनचे विक्रम मोडू शकणारा एकमेव फलंदाज म्हणून गणला जातो तोही या विक्रमापासून जवळपास तब्बल ८ हजार धावा दूर आहे. सचिन सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ३४ हजार ३५७ धावा करून टॉपवर आहे. त्याच्या खालोखाल २८ हजार १६ धावा करत श्रीलंकेचा कुमार संगकारा दुसऱ्या तर रिकी पॉन्टिग २७ हजार ४८३ धावा करत या यादीत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत २१ हजार ९०१ धावा झाल्या आहेत.