ब्रिस्बेन : पुढारी ऑनलाईन
ब्रिस्बेनमधील चौथी कसोटी जिंकून भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली. भारताच्या या विजयावर संपूर्ण जगभरातून कौतुक होत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय संघाचे कौतुक करत भारताला कमी लेखण्याची चूक केली, आम्हाला मोठा बोध मिळाला असल्याचे म्हटले आहे.
एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लँगर म्हणाले, ‘भारताची लोकसंख्या दीड अब्ज आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशातील अंतिम ११ खेळाडू खरोखर सर्वोत्तम आणि बलाढ्य असेच असतील. मालिका रोमहर्षक होती. कुणी एक संघ जिंकणार. आज मात्र कसोटी क्रिकेट जिंकले.
तसेच, या पराभवातून आम्हाला मोठा धडा मिळाला आहे. भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक कधीच करू नये असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते हे देखील जखमी भारतीय वाघांनी चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी खरे करून दाखविले. ३२८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गड्यांनी दणदणीत पराभव केला. कसोटी मालिकाही २-१ अशा फरकाने खिशात घातली.