Sun, Aug 09, 2020 01:44होमपेज › Sports › गुड न्यूज...बुमराह फिट !

गुड न्यूज...बुमराह फिट !

Last Updated: Dec 13 2019 9:26PM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

पाठीच्या दुखापतीनंतर रिहॅबिलिटेशमध्ये असलेला जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी नेटमध्ये भारतीय संघासोबत सराव करणार आहे. बुमराह ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’मुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेच्या सुरुवातीपासूनच संघाबाहेर आहे. अगामी न्यूझीलंड दौर्‍यापूर्वी तो फिट होईल, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना 18 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये खेळविण्यात येईल. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, बुमराह भारतीय संघासोबत सराव करणार आहे. संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वर कुमारची फिटनेस चाचणी इंदूरमध्ये बांगला देशविरुद्धच्या कसोटी सामन्यात घेण्यात आली होती; पण तो संघात सहभागी नव्हता. त्याचप्रमाणे बुमराहच्या फिटनेसची देखील चाचणी घेण्यात येईल.     

जेव्हा कोणीही खेळाडू फिट होताना दिसतो तेव्हा संघ व्यवस्थापन, फिजिओ, ट्रेनर नेटमध्ये सरावाच्या माध्यमातून त्यांची चाचणी घेतात, असे सूत्रांनी सांगितले. बुमराह व हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात व मुंबईच्या बीकेसी येथील मैदानावर त्यांचे रिहॅबिलिटेशन सुरू आहे. बुमराहला भारतीय संघासोबत न्यूझीलंडला पाठवण्यात येऊ शकते अशी संभावना सूत्रांनी व्यक्त केली.
भुवनेश्वर कुमार एकदिवसीय मालिकेला मुकणार ?

भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र, भारताचा आघाडीचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या एकदिवसीय मालिकेतील समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यानंतर त्याला वेदना होत असल्याचे त्याने संघ व्यवस्थापनाला सांगितले होते. या संबंधात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही; पण दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील सहभागावर साशंकता आहे.दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर असलेल्या भुवनेश्वर कुमारने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले होते. दुखापतीच्या कारणामुळे भुवनेश्वर कुमार 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर क्रिकेटपासून दूर राहिला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यातदेखील त्याला दुखापतीमुळे संघात समाविष्ट करण्यात आले नव्हते.