Fri, Apr 23, 2021 14:15
MIvsRCB: ३ वर्षात २ वेळाच ‘असं’ घडलंय!

Last Updated: Apr 08 2021 7:07PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

इंडियन प्रीमियर लीग 2021 चा उद्घाटनाचा सामना उद्या शुक्रवारी (दि. 9) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या संघांदरम्यान होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आतापर्यंत एकदाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. 

अशातच आयपीएलच्या 14 व्या सीझनच्या उद्घाटन सामन्यता विराट कोहलीची सेना रोहित शर्मा ब्रिगेडवर मात करू शकेल काय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसाठी मुंबईवर विजय मिळवणं सोपं असेल याची शक्यता कमीच आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळूर मागील तीन वर्षांमध्ये दोनवेळाच मुंबई इंडियन्स संघावर मात करू शकला आहे. आरसीबीने मुंबई इंडियन्सवर शेवटचा विजय 28 सप्टेंबर 2020 मध्ये मिळवला आहे. त्या सामन्यात निकाल हा सुपर ओव्हरमध्ये लागला. त्याआधी आरसीबीने मुंबईला एक मे 2018 मध्ये हरवलं होतं. मागील तीन वर्षांत दोन्ही संघांदरम्यान ६ सामने खेळले गेले आहेत. यातील ४ सामन्यांत रोहित शर्माच्या मुंबई ब्रिगेडने कोहली सेनेनेला पराभवाची धूळ चारली आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि आरसीबी बाबत एकंदरीत चर्चा करायची झाल्यास दोन्ही संघ 27 सामन्यांमध्ये एकमेकांना भीडले आहेत. यातील मुंबई इंडियन्सने 17 आणि आरसीबीने 9 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीने मुंबई इंडियन्स विरुद्ध आतापर्यंत 18 सामने खेळले आहेत. यातील केवळ पाच सामन्यांत विजय मिळवणं शक्य झालं आहे. तर 12 सामन्यांत पराभव झाला आहे. तर सामना ड्रॉ झाला आहे.