Fri, Apr 23, 2021 13:00
IPL: सर्वाधिक ‘क्लिन बोल्ड’ करणारा गोलंदाज कोण?

Last Updated: Apr 08 2021 4:21PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबई इंडियन्स हा ‘आयपीएल’मधील सर्वात यशस्वी संघ आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या संघाच्या उत्कृष्ट प्रदर्शनात मोठा वाटा उचलला आहे. या खेळाडूंच्या यादीत माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावाचा समावेश आहे. आयपीएलच्या इतिहासात मलिंगाने सर्वाधिक फलंदाजांना क्लिनबोल्ड केले आहे. 

मलिंगा मागील वर्षी म्हणजेच २०२० पासून संघाचा भाग राहिलेला नाही. पण त्याचे प्रदर्शन नेहमीच चांगले राहिले आहे. तो आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असून त्याने सर्वाधिक फलंदाजांना क्लिनबोल्ड केले आहे. त्याने आयपीएलच्या ११२ सामन्यांमध्ये एकूण ६३ फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे. त्याच्या नावावर एकूण १७० विकेट घेतल्या आहेत. मलिंगाचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन १३ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट असे आहे. एका सामन्यात चार विकेट घेण्याचा पराक्रम त्याने एकूण ६ वेळा तर ५ विकेट घेण्याची किमया एकदाच केली आहे. 

दरम्यान, फलंदाजांना क्लिन बोल्ड करणा-या गोलंदाजांच्या यादीत दुस-या क्रमांकावर फिरकीपटू पीयूष चावला आहे. पियुष यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. त्याने आयपीएलमध्ये ४३ फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत. तर भुवनेश्वर कुमार आणि सुनील नरेन हे दोघे या यादीत तिस-यास्थानी आहेत. दोघांनी ३६-३६ फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक फलंदाजांना क्लिन बोल्ड करणारे टॉप ६ गोलंदाज

६३ - लसिथ मलिंगा

४३ - पीयूष चावला

३६ - भुवनेश्वर कुमार

३६ - सुनील नरेन

२९ - रवींद्र जडेजा

२९ - हरभजन सिंह