Tue, Aug 04, 2020 22:30होमपेज › Sports › अखेर बुमराहला सूर गवसला, विकेटचा दुष्काळ संपला 

अखेर बुमराहला सूर गवसला, विकेटचा दुष्काळ संपला 

Last Updated: Feb 15 2020 11:33AM
हॅमिल्टन : पुढारी ऑनलाईन 

न्यूझीलंड इलेव्हन विरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी किवींचा संपूर्ण संघ 235 धावात माघारी धाडला. भारताने पहिल्या डावात 28 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताचे प्रमुख अस्र असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह निरस्र झाला होता. पण, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी त्याला सूर गवसला असून त्याने आपली सरासरी सुधारत विकटचा दुष्काळही संपवला आहे. 

वाचा : मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबवर दोन वर्षाची बंदी 

सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या दिवशी 9 बाद 263 धावा केल्या होत्या. शतक ठोकल्यानंतर निवृत्त झालेला हनुमा विहारी पुन्हा फलंदाजीला आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने आपला पहिला डाव सुरु केला. पण, भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा मुकाबला करणे अवघड गेले. एकदिवसीय सामन्यात एकही बळी न मिळवू शकलेल्या जसप्रीत बुमराहने भारताला तिसऱ्या षटकात पहिले यश मिळवून दिले. या विकेटबरोबरच बुमराहने एकदिवसीय मालिकेतील आपला विकेटचा दुष्काळ संपवला. त्याने 11 षटकात 18 धावा देत 2 विकेट घेतल्या आहेत. त्याने सरासरीही (1.64) उत्तम राखली आहे. एकदिवसीय मालिकेत त्याला विकेट घेण्याबरोबरच धावा रोखण्यातही अपयश आले होते. 

वाचा : ....तर डिटेंशन कॅम्पमध्ये मीच पहिल्यांदा जाणार : मुख्यमंत्री गेहलोत 

वाचा : दक्षिण आफ्रिकेने टाळला पाक दौरा

बुमराह बरोबरच मोहम्मद शमीने 3, नवदीप सैनी आणि उमेश यादवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर  आर. अश्विनने 1 विकेट घेतली. न्यूझीलंडकडून हेन्री कूपरने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर सलामीवीर रचीन रविंद्र 67 चेंडूत 34 धावांची खेळी करुन बाद झाला. कर्णधार डॅरेल मिशेलनेही 32 धावांची खेळी केली. भारताकडे आता 28 धावांची आघाडी आहे. दरम्यान, भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉने दुसऱ्या डावातही आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी पृथ्वी शॉ 5 चौकार आणि 1 षटकात मारत 35 धावांवर खेळत होता. तर मयांक अग्रवालने नाबाद 23 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 7 षटकात बिनबाद 59 धावा झाल्या आहेत. भारतकडे आता 87 धावांची आघाडी आहे.