Sat, May 30, 2020 14:28होमपेज › Sports › कोरोना लॉकडाऊनचा आम्हाला फायदाच : रवी शास्त्री 

कोरोना लॉकडाऊनचा आम्हाला फायदाच : रवी शास्त्री 

Last Updated: Mar 28 2020 5:39PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत असल्याने जगभरातील सर्वच प्रमुख शहरातील आणि देशातील व्यवहार ठप्प झाला आहे. या कोरोनाचा फटका खेळ जगतालाही बसला आहे. जगभरातील विविध खेळांच्या स्पर्धा, सराव शिबीरे रद्द करण्यात आली आहेत. जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिकही पुढे ढकलण्यात आली आहे. पण, या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोरोनामुळे सक्तीच्या लॉकडाऊनचा भारतीय संघाचा फायदाच झाल्याचे वक्तव्य केले. 

रवी शास्त्री यांनी स्काय स्पोर्ट्सच्या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल अथर्टन, नासिर हुसैन आणि रॉब की यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी शास्त्रींनी सांगितले की 'न्यूझीलंडमधील पाच टी - 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची शारिरीक आणि मानसिक थकवा आणणाऱ्या मालिकांनंतर खेळाडूंना हा रिकामा वेळ स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. ज्या प्रमाणात आम्ही गेल्या काही महिन्यात क्रिकेट खेळलो आहे त्यामुळे त्याचा ताण संघावर पडण्यास सुरुवात झाली होती. मी आणि काही सपोर्ट स्टाफमधील सहकारी मे 2019 मध्ये इंग्लंडमधील वर्ल्डकपनंतर आतापर्यंत जवळपास फक्त 10 ते 11 दिवसच घरी जाऊ शकलो.'  

ते पुढे म्हणाले, 'संघातील काही खेळाडू तीनही फॉरमॅट खेळतात त्यामुळे त्यांच्या शरिरावर किती ताण पडत असेल याची कल्पना तुम्हाला आली असेलच. विशेष करुन टी - 20 मधून कसोटी फॉरमॅटमध्ये जुळवून घेणे, मोठा काळ प्रवासात घालवणे याच्या परिणाम होतोच. जरी लॉकडाऊनमुळे घरी बसणे अवघड असले तरी ही सक्तीची विश्रांती खेळाडूंसाठी स्वागतार्ह आहे.'

भारतात लागू असेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनवर शास्त्री म्हणाले, 'न्यूझीलंड दौऱ्यानंतर असलेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द झाल्यानंतर असे काही होईल याचा अंदाज खेळाडूंना आला होता. जरी हे धक्कादायक असले तरी मालिकेवेळी याचा आम्हाला अंदाज आला होता. ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत होता, त्यानंतर द. आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनेडे रद्द करण्यात आली त्यावेळी कहीतरी होणार आहे याची कल्पना आली आणि लॉकडाऊन जाहीर झाले.' 

रवी शास्त्री यांनी कोरोनाची व्याप्ती वाढत चालल्याचा अंदाज न्यूझीलंडमध्येच आल्याचे सांगितले. 'मालिका संपण्याच्या वेळी जागतिक विमान वेळापत्रकात अनपेक्षित बदल होत होते त्यावेळीच आम्हाला याची व्याप्ती वाढत असल्याचा अंदाज आला होता. ज्यावेळी आम्ही भारतात उतरलो त्यावेळी मला वाटले की आपण योग्य वेळी परिस्थितून बाहेर पडलो. त्यावेळी न्यूझीलंडमध्ये दोनच कोरोना पॉझिटिव्ह अढळले होते. त्यानंतर आता तेथील संख्या 300 वर गेली आहे.' 

ज्यादिवशी आम्ही भारतात परतलो त्यानंतर लगेचच विविध आंतरराष्ट्रीय विमानतळांवर लोकांच्या चाचण्या घेण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे आम्ही अगदी मोक्याच्या वेळी मायदेशात परतलो असेही शास्त्री म्हणाले.