सिडनी : पुढारी ऑनलाईन
ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज स्टीव्ह स्मिथने आज ( दि. २४ ) पत्रकार परिषदेत आपण आता चांगल्या लयीत आलो आहोत असे सांगितले. त्याने आयपीएलमध्ये आपल्याला मनाप्रमाणे फलंदाजी करता आली नव्हती असे सांगितले. तो म्हणाला की आठवड्याभरापासून माझ्या फलंदाजीत बदल केला आहे. आता मी शुक्रवारपासून भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झालो आहे.
स्मिथ पुढे बोलताना म्हणाला की 'फलंदाजीत जे मला हवे होते ते परत मिळायला मला जवळपास ३ ते ४ महिने लागले. आता मला माझ्या फलंदाजीत चांगला सूर गवसला आहे असे जाणवत आहे. आता हे सांगणे कठीण आहे पण, दोन तीन दिवसांपूर्वीपर्यंत काहीतरी मिसिंग असल्याचे सतत जाणवत होते. पण, आता मला माझा सूर गवसला आहे.'
दरम्यान, स्मिथ हा अखूड चेंडूवर थोडा गडबडतो असे काहींचे मत आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज स्मिथला बाऊन्सरवर त्रस्त करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत होते. याबाबत स्मिथला विचारणा झाल्यावर त्याने 'तसं बघायला गेलं तर हे चांगलंच आहे की लोकांना मला बाऊन्सर टाकून बाद करु शकू असा विश्वास आहे. कारण याचा अर्थ मला बाद करण्यासाठीचे त्यांच्याकडे सर्व पर्याय संपले आहेत. यामुळे माला अधिक आत्मविश्वास मिळत आहे.'
स्मिथ म्हणाला की आयपीएलमध्ये त्याला त्याचा नैसर्गिक खेळ करण्यात अपयश आले होते. तो म्हणाला 'मी आयपीएलमध्ये जोराने फटके मारण्याचा प्रयत्न करत होतो. हा माझ्या फलंदाजीचा पिंड नाही. जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत की ते कधीही षटकार मारू शकतात आणि त्यापैकी मी एक नाही. माझ्या शैलीला क्रिकेटिंग शॉट्स खेळणे, गॅपमध्ये खेळणे सूट करते.'
कधीकाळी स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत होता. पण, २०१८ च्या बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर त्याचे कर्णधारपद गेले आहे. स्मिथने आता तो कसोटी कर्णधार टीम पेने आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार अॅरोन फिंच यांना सहाय्य करणार असल्याचे सांगितले. पण, त्याने भविष्यात नेतृत्व करण्याचे संकेतही दिले. तो म्हणाला 'सध्या मी याबाबत विचार करत नाही. मी फक्त माझे काम करत आहे आणि भविष्यात काय होते हे पाहू.'