अनिरुद्ध संकपाळ
भारताने गेल्या वर्षा दीड वर्षात कसोटीत आपला पाचवा सलामीवीर बदलला. या सलामीवीर बदलाचे वारे 2017-18 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून वहायला सुरुवात झाली. अखेर एमएसके प्रसादांच्या निवड समितीने सर्व पर्याय चाचपून दमले. त्यामुळे त्यांनी मुळचा मधल्या फळीत खेळणारा पण, कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत असलेला वनडे, टी- 20 संघाचा उपकर्णधार रोहितला आता तू कसोटीत सलामी कर असे फर्मान सोडले. 'मरता क्या नही करता'? रोहितने अंतिम अकरात खेळायला मिळणार म्हणून हे फर्मान शिरावर घेत सलामीची तयारी सुरु केली. सरावाचा पहिला प्रयत्न शुन्याने सुरु झाला. सर्वांनाच धडकी भरली हिटमॅन अपयशी झाला तर त्याचा युवराज सिंग होईल मर्यादीत षटकात किंग कसोटीत वेटिंवर पण, पठ्ठ्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्घच्या पहिल्या कसोटीत पहिल्याच सत्रात शतक ठोकत दिलासा दिला.
पण, किंतू परंतु आहेच
पण, हा पण काही त्याची पाठ सोडणार नाही कारणही तसेच आहे. मुंबईचा रोहित शर्मा कधीही सलामीवीर नव्हता. त्याचे पदार्पण हे एक मधल्या फळीतील फलंदाज म्हणून झाले आहे. नंतर त्याचा सलामीवीर करण्यात आला. तो मर्यादीत षटकांमध्ये चमकला पण, कसोटीत तो मधल्या फळातील फलंदाज म्हणूनच ओळखला जातो. परंतु त्याची कसोटी कारकिर्द काही वनडे आणि टी-20 सारखी अद्याप तरी फुललेली नाही. युवराज सारखाच तोही कसोटी संघात आद्याप तरी जम बसवू शकलेला नाही. त्यातच त्याला कसोटीत तुटपूंजी संधी मिळत गेली आहे. 2013 ला पदार्पण करणाऱ्या रोहितने आतापर्यंत फक्त 27 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. त्याची सरासरी जवळपास 40 ची आहे. असे असूनही तो कसोटीत अजूनही अनसेटलच आहे. त्यातच संघव्यस्थापनाच्या अजब धोरणाने त्याला आपली हक्काची जागा गमवावी लागली आहे.
निवड समितीचा दुजाभाव?
भारतीय संघाच्या निवड समितीने मधल्या काळात संघात स्थान मिळवू पाहणाऱ्या युवा खेळाडूंना आयपीएलमधील चमकदार कामगिरीच्या जोरावर पहिल्यांदा टी-20 संघात मग वनडे संघात त्यांनंतर कामगिरी पाहून कसोटी संघात स्थान देण्यात येत होते. भारतीय संघात आलेल्या जवळपास सर्वच गोलंदाज आणि फलंदाज याच फॉर्म्युल्याने कसोटी संघात आले. याला अपवाद ठरला तो फक्त रोहित शर्मा आणि हनुमा विहारी. रोहितला वनडे, टी - 20 मध्ये खोऱ्याने धावा करुनही कसोटीत म्हणावी तशी संधी मिळाली नाही. याला संघाची त्यावेळेची अष्टपैलू रणनीती तसेच निवड समितीची चुकलेली पॉलिसी या दोन्ही गोष्टींचा हातभार लागला.
रोहितने ज्या ज्या वेळी कसोटीची दारे ठोठावलीत त्या त्या वेळी त्याला बेंचवरच बसावे लागले कारण संघव्यवस्थापनाने एक फलंदाज कमी खेळवून अष्टपैलू खेळाडू खेळवण्याची रणनीती अवलंबली. त्यामुळे त्याच्या जागी संघात हार्दिक पांड्या नाहीतर आर अश्निन, जडेजा खेळत राहिले. त्यानंतर हार्दिक आपल्या जखमी होण्याने संघात आत बाहेर व्हायला लागल्यानंतर निवड समितीने पहिल्यांदा जयंत यादव आणि नंतर हनुमा विहारीला संधी दिली. दोघांनीही संधीचे सोने केले. आता हनुमा विहारी मधल्या फळीतील आपली जागा पक्की करुन बसला आहे. आता कामगिरी करुन जागा पक्की केल्यानंतर मग रोहितवर अन्याय कसा झाला? तर संधी देण्याबाबतीत जो शिरस्ता युवा खेळाडूंबाबत अवलंबण्यात आला त्याचा रोहितला संधी देताना विसर पडला. सध्याच्या घडीला वनडेत विराटनंतर भारताकडून सर्वाधिक शतके रोहितच्या नावावर आहेत. मग कसोटीत त्याच्या आधी युवा खेळाडूंनी संधी कशी दिली गेली.?
कर्णधाराच्या रेसमधील रोहितच्या पुर्नवसनाचा प्रयत्न?
या अन्यायाची जाणीव झाल्यानंतर निवड समितीने रोहितचे पुर्नवसन करण्यासाठी त्याला सलामीला पाठवण्याची क्लुप्ती शोधून काढली. कारण गेल्या दोन वर्षापासून कसोटीत ना जुने सलामीवीर सेट झाले ना नव्या दमाचे सलामीवीर सेट झाले. त्यालाही ऑप्शन आहेत म्हणून सतत बदल करण्याची प्रवृत्ती कारणीभूत ठरली असावी. बर त्यातही दुजाभाव केल्याचा संशय येण्यास वाव आहे. कारण मुरली विजयने दोन मालिकेच्या खराब कामगिरीवर संघातून डच्चू मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या नाराजीचा रोख एका सलामीवीराला सतत मिळणारी याच्याकडे होता. आता वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके करणाऱ्या रोहितचा कद संघात वाढला आहे. भारताच्या पराभवाला विराटच्या काही स्ट्रॅटेजीही कारणीभूत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यातच विराट आणि रोहितमध्ये वाद, मतभेद आहेत असेही जाणवत आहे. काही माजी खेळाडूंनी विराट ऐवजी रोहितला कर्णधार करा अशा मागणीही केली होती.
पृथ्वी शॉ संघात परतल्यानंतर काय?
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर रोहितला कसोटीतून डच्चू देण्याने विराट चमू आणि निवड समिती चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता होती. पण, समितीने रोहितचे सलामीच्या जागेवर पुर्नवसन करण्याचा प्रयत्न केला. पण, पहिल्या कसोटीत विशाखापट्टणमच्या बाऊन्स नसलेल्या स्विंग न होणाऱ्या खेळपट्टीवर सलामीला येत जवळपास पहिल्याच सत्रात शतक ठोकले. या शतकाने विराटसह ड्रेसिंग रुम आनंदली असली तरी कॉमेंटरी बॉक्समधील एका तज्ज्ञाने हे टेम्पररी सोल्युशन असल्याचे संकेत दिले आहेत. कारण रोहितच्या सलामीची खरी 'कसोटी' लागणार ती परदेशात कारण भारताने गेल्या दोन वर्षात केलेल्या दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आपल्याला सलामीची सर्व बेंच स्ट्रेंथ वापरावी लागली होती. भारताला या सलामीच्या क्रायसिसमधून सावरले ते 20 वर्षाच्या पृथ्वी शॉने. दुर्दैवाने त्याला पहिल्यांदा दुखापतीला सामोरे जावे लागले आणि त्यानंतर डोपिंग प्रकरणात 6 महिन्याच्या बंदीची शिक्षा भोगावी लागत आहे.
पण, शॉ परतल्यानंतर काय? हा प्रश्न आहेच कारण भारताचा दुसरा सलामीवीर मयांक अग्रवाल देशात आणि परदेशातही चांगली कामगिरी करत आहे. हे दोघेही भारताच्या सलामीचे भविष्य आहेत. त्यांच्याकडे फारकाळ कानाडोळा करता येणार नाही. त्यामुळे रोहितचे हे पुर्नवसन तात्पुरतेच ठरण्याची शक्यता आहे. त्यावेळी निवड समिती त्याचा विचार मधल्या फळासाठी करणार की त्याला नारळ देणार?