Wed, Jan 20, 2021 00:35होमपेज › Sports › 'गब्बर'च्या जागी ऋषभ; टीम इंडियाचा बॅकअप म्हणून इंग्लंडला रवाना

'गब्बर'च्या जागी ऋषभ; टीम इंडियाचा बॅकअप म्हणून इंग्लंडला रवाना

Published On: Jun 12 2019 12:34PM | Last Updated: Jun 12 2019 12:35PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

विश्वचषक २०१९ मध्ये दुसऱ्याच सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक फटकावणाऱ्या गब्बर शिखर धवनला अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर ठेवण्यात आले. धवन नंतर संघात त्‍याची जागी पर्याय म्हणून यष्टिरक्षक ऋषभ पंत दाखल होत आहे. भारतीय टीमचा बॅकअप म्हणून पंत इंग्लंडला रवाना झाला आहे. त्याला शिखर धवनच्या जागी ओपनर म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारताचा पुढील सामना उद्या १३ जूनला न्यूझीलंड विरुद्ध होत आहे. त्यापूर्वी पंत आज इंग्लंडमध्ये पोहोचणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

इंग्लंडला रवाना होण्यासाठी पंतला भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) हिरवा कंदिल दाखविला असल्याचे समजते. ऋषभ पंत आजच इंग्लंडला पोहोचणार आहे. धवन याची जागी कोण घेणार? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. धवनच्या जागी त्‍याच्याच तोडीचा खेळाडू घ्‍यावा असे अनेकांना वाटत असतानाच धवनची जागा ऋषभ पंतला संधी दिली आहे. 

वर्ल्ड कपचा संघ निवडण्यापूर्वी भारतीय संघात ऋषभ पंतची निवड पक्की मानली जात होती, पण त्याच्याऐवजी निवड समितीने दिनेश कार्तिकला संघात घेतले. ऑस्‍ट्रेलियाविरोधात रविवारी झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या धडाकेबाज खेळीनेच भारताने विजय खेचून आणला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईल याच्या एका उसळत्या चेंडूमुळे धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. परंतु, त्याची पर्वा न करता धवन पुढे खेळतच राहिला आणि धावांचे शिखर रचत १०९ चेंडूत ११७ धावा केल्या.