Wed, Aug 12, 2020 11:43होमपेज › Sports › शतक हुकल्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला...

शतक हुकल्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला...

Published On: Aug 23 2019 2:58PM | Last Updated: Aug 23 2019 3:09PM

संग्रहित छायाचित्रअँटिग्वा : पुढारी ऑनलाईन 

वेस्ट इंडीजविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी भारताची फलंदाजी ढेपाळली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या 6 बाद 203 धावा झाल्या होत्या. यात उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या 81 धावांचे मोलाचे योगदान आहे. त्याचे शतक अवघ्या 19 धावांनी हुकले. याबाबत मी स्वार्थी नाही त्यामुळे मी शतकाचा विचार करत नाही अशी प्रतिक्रिया त्याने दिली. 

सामना संपल्यानंतर 81 धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेला शतक हुकल्यानंतर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्याने 'ज्यावेळी मी खेळपट्टीवर असतो त्यावेळी मी फक्त संघाचा विचार करत असतो. मी स्वार्थी माणूस नाही त्यामुळे मी शतकाचा इतका विचार करत नाही. त्या अवघड विकेटवर 81 धावाही थोड्या नाहीत त्यामुळे आम्ही सध्या बऱ्या स्थितीत आहोत.' 

अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला 'मी किती वेळ संघासाठी योगदान देऊ हे महत्वाचे आहे. होय मी शतकाचा विचार करत होतो पण, आमच्या 25 वर 3 विकेट पडल्या होत्या. त्यावेळी फक्त मी संघाचा विचार करत होतो. मी शतकाचा फार विचार करत नाही कारण ते ओघाने येणारच आहे. '

अजिंक्य रहाणेने आपले शेवटचे कसोटी शतक ऑगस्ट 2017 ला श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये ठोकले होते. अजिंक्य रहाणेने वर्ल्डकप संघातून वगळल्यानंतर कौन्टी खेळण्यावर भर दिला होता. त्याचा फायदा त्याला होताना दिसत आहे.