Tue, Aug 11, 2020 22:13होमपेज › Sports › मैदानात पाय ठेवताच ‘विराट’च्या नावावर विक्रमाची नोंद

मैदानात पाय ठेवताच ‘विराट’च्या नावावर विक्रमाची नोंद

Last Updated: Oct 10 2019 12:43PM
पुणे: पुढारी ऑनलाईन

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीस आज पुण्यातील महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरुवात झाली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने मैदानात पाऊल ठेवताच नवा इतिहास रचला आहे. विराट ५० कसोटीत कर्णधार पदाचा कार्यभार सांभाळणारा दुसरा कर्णधार बनला आहे.

कर्णधार पदाचे अर्धशतक ठोकणारा विराट जगातील १४ वा तर भारताचा दुसरा कर्णधार ठरला आहे. या विक्रमातील पहिल्या स्थानावर माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आहे. तर दुसऱ्या स्थानी माजी कर्णधार सौरभ गांगुली होता. पण विराटने सौरभ गांगुलीला पछाडत दुसरे स्थान मिळवले आहे. 

विराट इतक्यावरच न थांबता कोहलीने ४९ सामन्यांपैकी २९ विजय मिळवून धोनीला मागे टाकले आहे. महेंद्रसिंग धोनी ६० सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे. मात्र, धोनीने ६० सामन्यांत २७ विजय मिळवले आहेत. धोनीने (२००८-२०१४) पर्यत कर्णधारपदाचा कार्यभार सांभाळला आहे. तर माजी कर्णधार सौरभ गांगुलीने (२०००-२००५) पर्यंत ४९ कसोटी सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.  

क्रिकेटच्या जगतात कर्णधारपदाची धुरा कसोटी सामन्यात अधिक काळ सांभळणारा दक्षिण अफ्रीकेचा खेळाडू आहे. त्याचे नाव ग्रीम स्मिथ असे आहे. स्मिथने १०९ कसोटी सामन्यात कर्णधारपदाची कमान सांभाळली आहे. 

स्मिथ नंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा एलन बॉर्डर आहे. बॉर्डर याने १९८४-१९९४ काळात ९३ कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळले होते. तर तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा  स्टीफन फ्लेमिंग हा खेळाडू आहे. त्याने ८० कसोटी सामन्यात कर्णधारपदाचा कार्यभार सांभाळला होता.