Wed, Jun 03, 2020 18:41होमपेज › Sports › 19 वर्षांखालील वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा

19 वर्षांखालील वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा

Last Updated: Dec 03 2019 1:18AM
मुंबई : वृत्तसंस्था 

उत्तर प्रदेशचा फलंदाज प्रियम गर्गवर दक्षिण आफ्रिकेमध्ये पुढील वर्षी होणार्‍या आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अखिल भारतीय ज्युनिअर निवड समितीने 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत होणार्‍या या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. आघाडीच्या फळीतील फलंदाज असलेल्या गर्गच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक व ‘लिस्ट ए’ गटात शतक झळकावले आहे.

गर्ग भारताच्या ‘क’ संघाचा भाग होता ज्यांनी गेल्या महिन्यात देवधर करंडक स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवले. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील 13 वी स्पर्धा 16 संघांदरम्यान खेळविण्यात येईल. तर, त्यांची विभागणी चार गटांत करण्यात आली आहे. भारतीय संघ ‘अ’ गटात असून, त्यांच्यासोबत जपान, न्यूझीलंड व श्रीलंका हे संघ असतील.प्रत्येक गटातील दोन संघ सुपर लीग गटासाठी पात्रता मिळवतील. भारतीय संघ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून, त्यांनी एकूण चारवेळा जेतेपद मिळवले आहे. 

भारतीय संघाने 2018 साली स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर 8 विकेटस्ने विजय मिळवला होता व स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा 19 वर्षांखालील संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे व यजमान संघ तीन एकदिवसीय सामन्यांसोबत चार देशांच्या मालिकेत सहभाग नोंदविणार आहे. चार देशांच्या मालिकेत भारतासोबत यजमान दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व झिम्बाब्वे देशांचे 19 वर्षांखालील संघ सहभागी होतील. हैदराबादचा सीटीएल रक्षण दक्षिण आफ्रिकेचा दौरा व चार देशांच्या मालिकेसाठी अतिरिक्त खेळाडू असेल.

विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा 19 वर्षाखालील संघ 

प्रियम गर्ग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, ध्रुव चंद जुरेल (उप-कर्णधार, यष्टिरक्षक), शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.