टी-२० वर्ल्डकप होणार की नाही? 'या' आहेत तीन शक्यता!

Last Updated: May 22 2020 4:04PM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

 यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेवर देखील कोरोना व्हायरसचे सावट दिसत आहे. यापूर्वी स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार होते. पण, कोरोना व्हायरसचे जगभरातील थैमान पाहता स्पर्धा स्थगित केली जाण्याची शक्यता वाढली आहे.

आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांसमोर जर टी 20 विश्वचषक स्पर्धा स्थगित केल्यास तर ती कधी खेळवायची याबाबत देखील संभ्रम असेल. सध्या तरी तीन पर्यायावर विचार करत आहे. पहिला म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपला फेब्रुवारी मार्चमध्ये आयोजित करण्याबाबत विचार करू शकतो. पण, यामध्ये एक अडचण देखील आहे. एप्रिल महिन्यात आयपीएल देखील होईल. यासोबतच ठरलेल्या कार्यक्रमानुसार इंग्लंडचा भारत दौरा देखील अडचणीत येऊ शकतो.

दुसरा पर्याय म्हणजे बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 2021 चा टी 20 वर्ल्ड कप आयोजित करण्याबाबत आपली तयारी दर्शवेल आणि 2022 मध्ये आपल्या येथे टी 20 वर्ल्ड कपचे आयोजन करावे. एका जवळच्या सूत्राने सांगितले की, बीसीसीआय टी वर्ल्ड कप सोडेल याची शक्यता कमीच आहे.

तिसरा पर्याय म्हणजे ऑस्ट्रेलियाने 2020 ऐवजी 2022 मध्ये वर्ल्ड कपचे आयोजन करावे. आयसीसी आणि सर्व खेळाडूंसाठी देखील हे योग्य ठरू शकते.वर्ल्ड कप स्पर्धेबाबत पुढील आठवड्यात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात आयसीसीची सदस्य बोर्डासोबत टेलीकॉन्फ्रेंसवर चर्चा होणार आहे. आयसीसीच्या या बैठकीत तीन महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपबाबत निर्णय घेणे. दुसरा म्हणजे चेअरमन पदासाठी निवडणूकीबाबत वेळेची निश्चित करणे आणि तिसरे म्हणजे निवडणूकाच्या तारखा आणि प्रक्रियेबाबत निर्णय घेणे.