नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज स्टिव्ह स्मिथ हा पारंपरिक पठडीतील फलंदाज नाही, फलंदाजीवेळी तो सतत हालचाल करीत असतो. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना गोलंदाजांचा गोंधळ उडतो, अशावेळी त्याला गोलंदाजांनी थोडा बाहेर चेंडू टाकला पाहिजे, असा सल्ला महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने भारतीय गोलंदाजांना दिला आहे. थोडक्यात, त्याने भारतीय जलदगती गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी मालिकेदरम्यान पाचव्या स्टम्पवर गोलंदाजी करण्यास सुचवले आहे. चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 2018-19 मध्ये झालेल्या मालिकेत स्मिथ मालिकेबाहेर होता. स्मिथने भारताविरुद्ध सहा कसोटी शतके झळकावली आहेत.
सचिन म्हणाला, स्मिथची फलंदाजी शैली पारंपरिक नाही. आपण कसोटी सामन्यात गोलंदाजांना ऑफ स्टम्प किंवा चौथ्या स्टम्पवर गोलंदाजी करण्यास सांगतो. स्मिथ फलंदाजी करताना मूव्ह होतो. त्यामुळे चेंडू चार ते पाच इंच आणखीन पुढे टाकावा लागेल. स्टिव्हला चौथ्या आणि पाचव्या स्टम्प लाईनवर गोलंदाजी करण्याचे लक्ष केले पाहिजे. भारताविरुद्धच्या मालिकेत मी शॉर्ट पिच गोलंदाजीसाठी तयार असल्याचे स्मिथ म्हणाल्याचे आपण वाचले आहे. गोलंदाज सुरुवातीलाच आक्रमक होतील असे त्याला वाटते. मात्र, ऑफ स्टम्पच्या बाहेर त्याची परीक्षा घ्यावी लागेल, असे सचिन तेंडुलकर म्हणाला.
भारताचे गोलंदाजी आक्रमण संतुलित
तुम्ही जर लाळेचा वापर करीत नाही, इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यादरम्यान ड्यूक चेंडू अधिक स्विंग करत नाही, खेळपट्टीवर अधिक गवत सोडणार की नाही याची कल्पना नसली तरीही चेंडू स्विंग न झाल्यास तुम्हाला स्विंग होणारा यॉर्करदेखील पाहायला मिळणार नाही, असे सचिन म्हणाला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आणि उमेश यादव यांच्या उपस्थितीत भारताचा जलदगती मारा प्रभावी दिसत आहे. सचिन म्हणाला की, मी नेहमी सांगत आलोय सध्या भारताकडे सर्वकालिन सर्वश्रेष्ठ आणि संतुलित असे गोलंदाजी आक्रमण आहे. कसोटी सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 20 विकेटस् मिळवावे लागतात. 20 विकेटस् मिळवण्यासाठी अधिक धावा देखील देता कामा नये. आक्रमक गोलंदाजीसोबत आपल्या एका बाजूने धावा देता कामा नये. सलग मेडन ओव्हर टाकत दबाव निर्माण केला पाहिजे.
स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरमुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी भक्कम
सलामी फलंदाजीबाबत बोलताना तेंडुलकर म्हणाला की, मयंकचे खेळणे जवळपास निश्चित आहे आणि रोहित उपलब्ध असेल तर त्याने मैदानात उतरले पाहिजे. अन्य खेळाडूंबाबतीत निर्णय हा संघ व्यवस्थापनेचा असेल. कारण, त्यांना खेळाडूंच्या फॉर्मबद्दल माहिती आहे. सध्या ऑस्ट्रेलियाची फलंदाजी फळीदेखील चांगली आहे. स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन संघासाठी महत्त्वाचे असतील. गेल्या मालिकेमध्ये सहभागी नसलेले दोन वरिष्ठ खेळाडू संघात आले आहेत आणि लॅबुशेनच्या उपस्थितीत फलंदाजी क्रमही चांगला झाला आहे. यावेळी दोन्ही संघांत चांगली स्पर्धा पाहायला मिळेल आणि भारत यासाठी तयार आहे.