Mon, Sep 21, 2020 19:28होमपेज › Sports › ऑलिम्पिकनंतर आयपीएलचा नंबर?

ऑलिम्पिकनंतर आयपीएलचा नंबर?

Last Updated: Mar 26 2020 9:55PM

बीसीसीआयनवी दिल्ली : वृत्तसंस्था

कोरोना महामारीमुळे जगातील सर्वात मोठी क्रीडा संग्राम असलेली ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर आता क्रिकेटचा मोठा संग्राम असलेली इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल रद्द करण्यासाठी बीसीसीआयवर दबाव वाढत आहे.

पूर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे आयपीएल 29 मार्चपासून सुरू होणार होती. परंतु, केंद्र सरकारने कोरोनावर केलेल्या पहिल्या उपाययोजनांमध्ये अनेक देशांचा हवाई संपर्क बंद केल्यामुळे ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यावेळी बीसीसीआयने स्पष्ट केले होते की, परिस्थितीमध्ये लाक्षणिक सुधारणा झाली तरच आयपीएल घेण्याविषयी विचार करण्यात येईल, असे बीसीसीआयने त्यावेळी स्पष्ट केले होते. परंतु, सध्या परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी आणखीनच बिकट होत चालली आहे. भारतात पाचशेहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. देशात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी म्हटले होते की, ‘ही गंभीर स्थिती पाहता माझ्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला त्यासारखीच परिस्थिती अजूनही आहे. गेल्या दहा दिवसांत काहीही सुधारणा झालेली नाही.’ 

स्पर्धा स्थगित करण्याचा विचार करावा : नेस वाडिया

किंग्ज इलेव्हनचे सहमालक नेस वाडिया यांनी या मुद्द्यावर स्पष्टता दर्शवली आहे. बीसीसीआयने आता आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. देशातील एक प्रमुख क्रीडा स्पर्धा आयोजक म्हणून आम्हाला जबाबदारीने काम करावे लागेल. जर मे महिन्यापर्यंत परिस्थिती आटोक्यात आली तर स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याकडे किती दिवस उरतील याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यावेळी परदेशी खेळाडूंना भारतात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल का? हाही मोठा प्रश्न आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयपीएल फ्रँचाईजींची मंगळवारी होणारी टेलिकॉन्फरन्सही रद्द करण्यात आली होती. 

मंडळ अजूनही आशावादी?

ग्लॅमर आणि स्पोर्टस्चा संगम असलेली ही स्पर्धा होईल अशी अजूनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आशा वाटत आहे. त्यामुळे स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात ते दिरंगाई करीत आहेत. या संबंधित एका बीसीसीआयच्या अधिकार्‍याने सांगितले की, जर ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी पुढे जाऊ शकते तर त्यामानाने आयपीएल खूप छोटी स्पर्धा आहे. ही स्पर्धा आयोजन करण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. परदेशी खेळाडूंना इतक्यात व्हिसा देण्याची सरकारची मानसिकता असेल असे वाटत नाही. 

21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर आता परिस्थिती लवकर सर्वसामान्य होईल, असे वाटत नाही. लॉकडाऊन उठवला तरीही 14 एप्रिलनंतरही अनेक बंधने लागू असतील. अशा परिस्थितीत लीग रद्द न करणे मूर्खपणाचे ठरेल.    - बीसीसीआय अधिकारी

 "