Wed, Sep 23, 2020 09:33होमपेज › Sports › वोक्स-बटलरचे अर्धशतक, इंग्लंडचा पाकवर विजय

वोक्स-बटलरचे अर्धशतक, इंग्लंडचा पाकवर विजय

Last Updated: Aug 09 2020 9:43AM
मॅन्चेस्टर : पुढारी ऑनलाईन 

ख्रिस वोक्स (नाबाद ८४) आणि यष्टीरक्षक जोस बटलर (७५) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा ३ गडी राखून पराभव केला. वोक्स-बटलर यांनी सहाव्या विकेटसाठी १३९ धावांची भागिदारी करून संघाचा विजय सुकर केला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. 

इंग्लंडने दोन वर्षानंतर पाकिस्तानला कसोटी सामन्यात मात दिली आहे. याआधी यजमान संघाने मे २०१८ मध्ये लॉर्ड्स कसोटी सामन्यात पाकवर ९ गडी राखून विजय मिळवला होता. 

इंग्लडसमोर विजयासाठी २७७ धावांचे आव्हान होते. इंग्लंडची दुस-या डावाची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या ११७ असताना पाचवा फलंदाज माघारी परतला होता. त्यामुळे संघ अडचणीत सापडला. त्यानंतर बटलर आणि वोक्सने जोडीने संघाचा मोर्चा सांभाळत संयमी खेळीचे प्रदर्शन केले. दोघांनी अर्धशतकी खेळी साकारली व १३९ धांवांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. लेगस्पिनर यासिर शाहने बटलरला बाद करून ही भागीदारी मोडली. बटलरने १०१ चेंडूच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार ठोकत ७५ धावा वसूल केल्या. बटलर बाद झाला तेव्हा इंग्लंडला विजयासाठी २१ धावांची गरज होती. 

बटलरच्या बाद झाल्यानंतरही वोक्स एका टोकाला ठामपणे खेळत राहिला. त्यांने स्टुअर्ट ब्रॉड (७) आणि डोमिनिक बेस (नाबाद ०) यांना घेवून संघाला विजय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवला. अखेर विजयासाठी चार धावांची गरज असताना वोक्सने शाहिन आफ्रिदीच्या एका चेंडूवर चौकार ठोकून पाकला पराभवाची धूळ चारली. वोक्सने १२० चेंडूत डावात १० चौकार ठोकत नाबात ८४ धावांची खेळी साकारली. पाकिस्तानकडून अनुभवी लेगस्पिनर यासिर शहाने ९९ धावांत चार बळी घेतले. त्याने पहिल्या डावातही यजमान संघाचे चार गडी बाद केले होते. 

दरम्यान पहिल्या डावात शान मसूदने ठोकलेल्या शतकाच्या (१५६) जोरावर पाकिस्तानने ३२६ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर गोलंदाज यासिर शहा, मोहम्मह अब्बास आणि शादाब खान यांनी केलेल्या भेदक मा-यापुढे इंग्लंडचा पहिला डाव २१९ धावांत गुंडाळला. त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानचा खेळ गडगडला. स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्स यांनी आक्रमक मारा करून पाकिस्तान फलंदाजांना सळोकीपळो करून सोडले. पाकचा दुसरा डाव १६९ धावांतच संपुष्टात आला. 

 "