Fri, Dec 04, 2020 04:22होमपेज › Sports › NZvsIND : अय्यरचा फिनिशिंग टच; भारताची विजयी सलामी

NZvsIND : अय्यरचा फिनिशिंग टच; भारताची विजयी सलामी

Last Updated: Jan 24 2020 4:06PM
ऑकलंड : पुढारी ऑनलाईन 

श्रेयस अय्यरच्या तुफानी ५८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी - २० सामन्यात ६ विकेट्सनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अय्यरच्या या फिनिशिंग टच खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने भारतासमोर २०४ धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडकडून कॉलिन मुनरो (59), रॉस टेलर (54) आणि केन विल्यम्सनने (५१) अर्धशतकी खेळी केली. भारतानेही रोहित बाद होऊनही दमदार सुरुवात केली. राहुल - विराटने दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागिदारी रचली. त्यानंतर दोघेही पाठोपाठ बाद झाल्याने भारतावर दडपण आले होते. पण, श्रेयस अय्यरने ३ षटकार, ५ चौकार मारत नाबाद ५८ धावांची खेळी करत भारताला ६ विकेट आणि १ षटक राखून विजय मिळवून दिला. 

न्यूझीलंडने ठेवलेल्या २०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला दुसऱ्याच षटकात भारताला पहिला धक्का बसला. डावखुरा फिरकी गोलंदाज सँटनरने आपल्या पहिल्याच षटकात रोहित शर्माला ७ धावांवरव बाद केले. पण, रोहितच्या रुपात भारताला मोठा धक्का बसला तरी लोकेश राहुल आणि कर्णधार विराटने पॉवर प्लेचा फायदा उचलत ५ व्या षटकातच भारताचे अर्धशतक धावफलाकावर लावले.

पॉवर प्ले संपल्यानंतरही या जोडीने फटकेबाजी करणे सुरु ठेवले. दरम्यान, लोकेश राहुलने २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर भारताचे शतकही धावफलकावर ९ व्या षटकात लागले. दरम्यान, विराट आणि राहुल दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी करण्याच्या उंबरठ्यावर होते. पण, इश सोधीने लोकेश राहुलला ५६ धावांवर बाद केले. त्यानंतर भारताच्या डावाची सर्व सुत्रे विराटकडे आली होती. पण, विराट ४५ धावांवर असताना टिकनेरच्या गोलंजीवर गप्टीलने अप्रतिम झेप पकडत भारताला दुसरा आणि मोठा धक्का दिला. 

भारताचे दोन्ही सेट झालेले फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे दोन्ही नवे फलंदाज खेळपट्टीवर होते. शिवम दुबेने धावगती कायम राखण्यासाठा आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने एक षटकार आणि एक चौकारही लगावला. पण, सोधाच्या फिरकीत तो फसला आणि १३ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर मनिष पांडे खेळण्यासाठी आला. भारताची पाठोपाठ दोन विकेट पडल्याने भारताची धावगती मंदावली. 

अखेरची ५ षटके राहिली असताना भारताला विजयासाठी ५३ धावांची गरज होती. यानंतर मनिष पांडे आणि श्रेयस अय्यरने मोठे फटके मारत धावगती वाढवण्यास सुरुवात केली. श्रेयस अय्यरने तुफानी अर्धशतकी खेळी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. त्यानेच १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार मारला. श्रेयस अय्यरने २९ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. त्याला मनिष पांडेने  १४ धावांची खेळी करुन चांगली साथ दिली. भारताने सामना एक षटक आणि सहा विकेट राखून विजय मिळवला. 

तत्पूर्वी, न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ऑकलंडच्या एडन पार्कच्या पाटा खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने आपल्या डावाची दमादार सुरुवात केली. कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील या धडाकेबाज सलामी जोडीने पाचव्या षटकातच किवींचे अर्धशतक धावफलकावर लावले. कॉलिन मुनरोने आक्रमक फलंदाजी करत वेगाने आपल्या अर्धशतकाकडे कूच केली. त्यापाठोपाठ गप्टीलनेही आपला धावा करण्याचा वेग वाढवला. भारतीय वेगवान गोलंदाज खेळपट्टीशी जुळवून घेण्यात झगडत असल्याचे दिसत होते. त्यातच मैदान छोटे असल्याने किवींचा धावांचा ओघ थांबवण्या त्यांना जड जात होते.  

दरम्यान, पॉवर प्ले संपल्यानंतर फिरकीपटू यझुवेंद्र चहलने टिच्चून मारा करत न्यूझीलंडचा धावांचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा शिवम दुबेला झाला. त्याने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या मार्टीन गप्टीलला ३० धावांवर रोहितकरवी झेलबाद केले. आक्रमक गप्टील बाद झाल्याने भारताला ८ व्या षटकात मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, आपल्या अर्धशतकाजवळ पोहचलेल्या मुनरोने आपले अर्धशतक ३६ चेंडूत पूर्ण केले. पण, अर्धशतक करणाऱ्या मुनरोला शार्दुल ठाकूरने बाद करत किवींना दुसरा धक्का दिला. पाठोपाठ जडेजानेही ग्रँडहोमीला शून्यावर बाद करत ११७ धावांवर किवींना तिसरा धक्का दिला. 

भारतीय गोलंदाज किवींना पाठोपाठ धक्के दिल्याने त्यांची धावगती मंदावली. दरम्यान, सेट झालेला कर्णधार केन विल्यम्सनला साथ देण्यासाठी अनुभवी रॉस टेलर मैदानावर आला होता. अखेरची ५ षटके राहिल्याने टेलर आणि केनने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडला १६ व्या षटकात १५० च्या पार पोहचवले. टेलर आणि केनने शमी टाकत असलेल्या १६ व्या षटकात तब्बल २२ धावा चोपून काढल्या. दरम्यान, केन विल्यम्सनने आपले २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर न्यूझीलंडही १८० च्या जवळ पोहचला होता. पण, अर्धशतकानंतर केन विल्यम्सला चहलने ५१ धावांवर बाद करत भारताला मोठा दिलासा दिला. 

त्यानंतर रॉस टेलरनेही किवींना २०० च्या पार पोहचवत आपल्या अर्धशकत पूर्ण केले. त्याने केलेल्या २७ चेंडूत नाबाद ५४ धावांची खेळीमुळे न्यूझीलंड २०३ धावांपर्यंत पोहचू शकला. भारताकडून फिरकीपटू चहल आणि जडेजाने प्रभावी मारा करत किवींची धावगती रोखण्याचा प्रयत्न केला. त्याला शिवम दुबेनाही चांगली साथ दिली. पण, प्रमुख वेगवान गोलंदाज शमी आणि ठाकूरने अधिक धावा झाल्या. बुमराह, ठाकूर, दुबे, जडेजा आणि चहलने प्रत्येकी १ विकेट घेतली.